माऊलींच्या पालखी सोहळ्याचे १९ जूनला आषाढी वारीसाठी प्रस्थान
नातेपुते, माळशिरस, वेळापूर पालखी तळ बदलण्याची मागणी
(सूर्यकांत भिसे)
पंढरपूर : कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आषाढीवारी साठी १९ जूनला श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून या सोहळ्यातील वाढती वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता पालखी तळ अपुरे पडत आहेत. नातेपुते, माळशिरस व वेळापूर येथील पालखी तळाची जागा बदलून द्यावी अशी मागणी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्थ योगी निरंजननाथ यांनी केली.
श्री क्षेत्र पंढरपूर येथे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व दिंडी समाजाची आषाढी वारीच्या नियोजनाची बैठक सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड राजेंद्र उमप, व्यवस्थापक माऊली वीर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माऊली जळगावकर, विठ्ठल महाराज वासकर, नाना महाराज वासकर, रामभाऊ चोपदार, दिंडी समाजाचे मारुती कोकाटे, राजाभाऊ थोरात, भाऊ फुरसुंगीकर यांच्यासह दिंडी समाजाचे प्रमुख पदाधिकारी, दिंडी प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी शेडगे दिंडी क्रमांक ३ चे प्रमुख जयसिंग महाराज मोरे यांच्यासह वर्षभरात निधन पावलेल्या दिंडीकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
योगी निरंजनाथ म्हणाले, तसा यंदाच्या पालखी सोहळ्यात फारशा अडचणी नाहीत. परंतु हडपसर पासून पालखी मार्गाचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे, ते पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षीत आहे. दिवे घाटात रस्ता रुंदीकरण सुरू आहे तेथे पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता आहे. तेथे लोखंडी जाळी मारावी. फलटण ते धर्मपुरी रस्ता अपूर्ण आहे तो पूर्ण करावा. नातेपुते, माळशिरस व वेळापूर येथील पालखीतळ अपुरे पडत आहेत. नातेपुते येथे गावा बाहेर पालखी तळाला जागा द्यावी, माळशिरस येथे कृषी कार्यालयाजवळील जागा द्यावी तर वेळापूर येथील पालखी तळ हा रस्त्यात गेला आहे. तेथे दुर्घटना होण्याची शक्यता आहे . या तळाची जागा बदलून शेती महामंडळाची जागा पालखी तळासाठी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
या बैठकीत दिंडी समाजाने पाणी, फिरती शौचालये या विषयी प्रश्न उपस्थित केले. शौचालय असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे. शौचालयात पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
यंदा प्रस्थान दिवशी गुरुवार आल्याने माऊलींच्या पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता प्रस्थान होणार असून यंदा तिथीचा क्षय झाल्याने पालखी सोहळ्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितले.