पुरंदर आयटी पार्क
उद्या उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे बैठक
पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील दिवे, कोडीत व चांबळी गावांमध्ये प्रस्तावित आयटी पार्कबाबत उद्या (गुरुवारी ) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी केलेल्या मागणीनुसार ही आयटी पार्क प्रस्तावित करण्यात आले होते. यात काय निर्णय होतो याकडे सबंध तालुक्याचे लक्ष लागून आहे.
आमदार शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेताना गुंजवणी, विमानतळ, आयटी पार्क असे प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार विमानतळ प्रकल्पाचे कामकाज सध्या वेगाने सुरू आहे. शिवतारे यांनी आता आयटी पार्ककडे मोर्चा वळवला असल्याचे दिसून येते. याबाबत शिवतारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पुणे शहरातील हिंजवडी आणि खराडी ही ठिकाणे आयटी हब म्हणून ओळखली जातात. परंतु प्रचंड ट्रॅफिक, वाहतूक कोंडी, अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे आयटी उद्योजक हैराण होऊन राज्याबाहेर जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात जागा देण्यास आम्ही अनुकूलता दर्शवली आहे. दिवे, चांबळी, कोडीत या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गायरान जागा उपलब्ध आहे. याच भागात विमानतळ, रिंगरोड, राष्ट्रीय महामार्ग असे प्रकल्प अवघ्या काही अंतरावर आहेत. या पार्श्वभूमीवर आयटी पार्कसाठी पुरंदर हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. मागील बैठकीत याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा हस्तांतरण करण्याचे आदेश दिले होते. उद्याच्या बैठकीत या सर्व बाबींचा आढावा घेतला जाईल.
बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार विजय शिवतारे, उद्योग विभागाचे सचिव, एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, पुण्याचे जिल्हाधिकारी, उद्योग विभागाचे सहसचिव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसीच्या भूमी विभागाचे महाव्यवस्थापक आणि पुणे प्रादेशिक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.