विमानतळ बाधित गावातील शेतकरी बसणार उपोषणाला
४ एप्रिल पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण
पुरंदर:
पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे, खानवडी, मुंजवडी, एखतपुर, कुंभारवळण, वनपुरी व उदाचीवाडी या गावांवर शासनाने अन्यायकारक पद्धतीने विमानतळ लादलेले आहे. त्याच्या भूसंपादनासाठी शासन शेतकऱ्यांचा गळा दाबू पाहत आहे. शासनाच्या या भूमिकेच्या विरोधात सातही गावातील शेतकरी दि. ४ एप्रिल पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणासाठी बसणार असल्याचे निवेदन पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपुत यांना पारगावच्या सरपंच ज्योती मेमाणे यांच्या सहीने ग्रामस्थांनी दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे, शासनाने सर्वेक्षण आणि भूसंपादन याची प्रक्रिया सुरू केल्याने सामान्य आणि गरीब शेतकरी भयभीत झालेले आहेत. लोकप्रतिनिधी पालकमंत्री व प्रशासन शेतकऱ्यांचा विचार न करता त्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सातही गावातील शेतकरी हवालदील झालेल्या असून गावागावात झालेल्या बैठकांमधून उपोषण करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे.
यावेळी विठ्ठल मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, नारायण मेमाणे, पांडुरंग मेमाणे, पोपट मेमाणे, माऊली मेमाणे, भाऊसाहेब मेमाणे, राजेंद्र मेमाणे उपस्थित होते.
कोट....
"जोपर्यंत सर्वेक्षण आणि मोजणी व संपूर्ण प्रक्रिया शासन माघारी व रद्द करीत नाही तोपर्यंत आमचे उपोषण सुरु ठेवणार अहे तरी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांनी शेतकऱ्यांचा बळी घेऊ नये"
चेतन मेमाणे, उपसरपंच (पारगाव मेमाणे)