सासवडच्या वनरक्षकाने मागितली शेतकऱ्याला लाच
लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने वनरक्षकाला रंगेहात पकडले
पुरंदर :
सासवड वन विभागाच्या वनरक्षकाने गुन्हा न दाखल करण्यासाठी शेतकऱ्याला दोन लाख रुपयांची मागणी केली होती. पीडित शेतकऱ्याने अँटी करप्शन ब्युरो कडे याबाबत तक्रार केली असता वनरक्षकाला पैसे घेताना रंगेहात पकडून त्याच्यावर सासवड पोलीसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचखोर अधिकारी गोविंद रामेश्वर निर्डे (वय ३२ वर्ष) पद वनरक्षक, नेमणुक वनपरिक्षेत्र कार्यालय, सासवड वनविभाग, जि. पुणे (वर्ग-३, अराजपत्रित) असे नाव आहे.
ॲंन्टी करप्शनच्या पुणे यांच्याकडून वनपरिक्षेत्र कार्यालय, सासवड वनविभाग, जि. पुणे येथील वनरक्षक यांना लाच मागणी व लाच स्विकारले प्रकरणी ताब्यात घेतलेबाबतची प्रेस नोट नुकतीच प्राप्त झाली आहे. त्यानूसार यातील तक्रारदार यांनी त्यांच्या पाळीव जनावरासाठी मुरघास तयार करण्यासाठी खोदलेला खड्डा वनविभागाच्या जागेत खोदला होता. वनविभागाने सांगितल्यानंतर तक्रारदार यांनी तो खड्डा बुजवला. परंतू वनरक्षक गोविंद निर्डे यांनी तक्रारदारावर वन अधिनियमानुसार गुन्हा नोंदवून कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे २,००,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार गुरुवारी दि. ३ मार्च रोजी तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.
या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने ला.प्र.वि. पुणे यांनी तात्काळ शुक्रवारी दि. ४ मार्च रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक गोविंद निर्दे यांनी तक्रारदाराकडे त्यांचे विरुद्ध वन जमिनीवर केलेल्या अतिक्रमणावर वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल न करण्याकरीता सुरवातीस २ लाख रुपयाचे लाचेची मागणी करुन, तडजोडीअंती १,००,००० रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी दि. ४ मार्च रोजी लोकसेवक गोविंद निर्डे यांनी तक्रारदाराकडून १,००,००० रुपये लाच रक्कम श्रीनाथ रसवंती गृह, वीर फाटा, सासवड, जि. पुणे येथे पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याचेविरुद्ध सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती. भारती मोरे पुढील तपास करत आहेत.