"संघटना म्हणून ज्या पत्रकारावर हल्ला झाला, ज्यांच्यावर अन्याय झाला त्या पत्रकारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य" : एस.एम देशमुख एस.एम.देशमुख.
मुंबई :
"संघटना म्हणून ज्या पत्रकारावर हल्ला झाला, ज्यांच्यावर अन्याय झाला त्या पत्रकारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. स्वाती हडकर या पत्रकार आहेत आणि बातमी दिल्याने त्यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी आम्हाला एवढे पुरेशे आहे असं म्हणत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी महिला पत्रकार 'चिपळून न्यूज' या युट्यूब चॅनलच्या संपादिका स्वाती हडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध व्यक्त केला.
'चिपळूण न्यूज' या युट्यूब चँनलच्या संपादिका स्वाती हडकर यांच्यावर काल रात्री चिपळूण येथे वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला असून त्यांना जखमी अवस्थेत चिपळूण येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चिपळूण येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा केला जातो. या वाळू माफियांना राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्याचे बोलले जाते. स्वाती हडकर यांनी मात्र सातत्याने या रेती माफियांच्या विरोधात लिखाण केले. याबद्दल हितसंबंधियांच्या मनात राग होताच. काल रात्री हडकर रेती उत्खनन सुरू होते तेथे पोहोचल्या आणि आपल्या कँमेरयातून घटनेचं चित्रिकरण करू लागल्या. तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख पुढे म्हणाले, "एखाद्या पत्रकारावर जेव्हा हल्ला होतो तेव्हा त्याच्याच बदनामीची मोहीम सुरू होते. पत्रकार बोगस आहे इथपासून तो खंडणीखोर आहे इथ पर्यत अनेक आरोप करून हल्ला प्रकरणाचे अप्रत्यक्ष समर्थन केले जाते. ज्या पत्रकारावर हल्ला होतो त्याला जनतेची सहानुभूती मिळू नये, विषयाचं गांभीर्य संपून जावं ही देखील या मागची योजना असते. हितसंबंधी, हल्लेखोर हे करतात तेव्हा ते आपण समजू शकतो. मात्र अनेकदा आपले सहकारी पत्रकारच या मोहिमेत सहभागी होतात तेव्हा वाईट वाटते आणि आपलेच काही सहकारी अप्रत्यक्ष हल्लेखोरांना मदत करतात याचा संतापही येतो. तुषार खरात असेल किंवा आता स्वाती हडकर असेल या दोन्ही वेळेस अशा घाणेरड्या मानसिकतेचा प्रत्यय आला."
देशमुख पुढे म्हणतात, "स्वाती हडकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मला काही फोन आले. स्वाती हडकर यांच्या पत्रकार म्हणून असलेल्या भूमिकेबद्दलच शंका उपस्थित केली गेली. हल्लाच झाला नाही असेही सांगितले गेले. मात्र स्वाती हडकर या पत्रकार आहेत आणि वाळू उपशयाच्या बातम्या दिल्याने त्यांच्यावर हल्ला झाला हे वास्तव आणि त्यांचे फोटोही समोर आले. त्यामुळं असं घडलंच नाही असं जे सांगत होते ते तोंडावर पडले. एक पत्रकार कायम दुसरयाचा दु:श्वास करतो हे जगजाहीर आहे. मात्र, किमान अशा वेळेस तरी आपसातील मतभेद, हेवेदावे विसरून आपण एकत्र आलं पाहिजे. अन्यथा आपण चून चून के मार खात राहू. आपणच आपल्या पत्रकाराच्या चारित्र्याचा जेव्हा विषय काढतो तेव्हा आपण अप्रत्यक्ष हल्लेखोरांची दलाली करीत असतो. हे सर्वथा गैर आणि असमर्थनीय आहे. असं करणारे हे का विसरतात की, आपणही धुतल्या तांदळासारखे नाहीत आणि म्हणूनच कधी तरी अशी वेळ आपल्यावरही येऊ शकते.