महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच मी सरपंच होऊ शकले : तेजश्री काकडे ( सरपंच नीरा)
नीरा दि. ११
महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना शिक्षण घेण्याची संधी निर्माण करून दिली.त्यांच्या मुळेच आज समाजातील मुलींना शिक्षणाची संधी मिळते आहे. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.आज अनेक क्षेत्रात मुली आपले कर्तुत्व सिद्ध करीत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी अत्यंत अवघड कालखंडात मोठी जबाबदारी घेतली आणि महिलांसाठी शिक्षणाचे कवाडे खुली केली.त्यामुळे चूल आणि मुल सांभाळणारी महिला आज घराच्या बाहेर पडू शकली. आज मी एका मोठ्या गावाची सरपंच होऊ शकले ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुळेच. त्यामुळे त्यांचे विचार आपण आंगिकरायला हवेत आणि ते पुढच्या पिढीलाही शिकवायला हवेत, असे प्रतिपादन नीरा गावाच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी केले आहे.
नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज (शुक्रवारी) नीरा ग्रामपंचायत, समस्त माळी समाज बांधव व ग्रामस्थ नीरा यांच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी सरपंच तेजश्री काकडे,उपसरपंच राजेश काकडे, श्री संत सोपान काका सोहळ्याचे त्रिगुण गोसावी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शैलेश रासकर, माजी उपसरपंच कल्याण जेधे, दीपक काकडे , ग्रामपंचाय सदस्य अनिल चव्हाण, अभिषेक भालेराव, आनंता शिंदे कीर्तनकार फरांदे महाराज,ऍड.आदेश गिरमे,अमोल साबळे, संदीप जावळे, पृथ्वीराज चव्हाण यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नीरा येथील आठवडे बाजाराला महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव
महात्मा फुले यांच्या जयंतीच औचित्य साधून नीरा येथील आठवडे बाजाराला महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात आलेले आहे. आज बाजार तळाच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमानीच्या कामाचं शुभारंभ करण्यात आला. या कमानीवरच महात्मा फुले भाजी मंडई असं नाव दिलं जाणार असल्याचं नीरेचें उपसरपंच राजेश काकडे यांनी म्हटले. तर महात्मा फुले यांचे नाव दिल्याबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत.