आमचे फक्त पगार वेळेवर करा हो : आता कामावर येण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीत
राज्यातील आरोग्य सेवेतील 32 हजार कामगारांवर उपासमारीची वेळ
राज्यभरात काळयाफिती लावून कंत्राटी कामगारांचं आंदोलन
बारामती
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कामगारांना दिला जाणारा पगार गेल्या तीन महिन्यापासून झाला नसल्याने, त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आलीय. घरापासून ज्या हॉस्पिटलला कामाला ते जातात तिथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसा नसल्याने किमान आमचे पगार तरी वेळेवर करा. असे म्हणण्याची वेळ आता या कामगारांवर आलीय. तीन महिन्याचा पगार मिळावा म्हणून या कर्मचाऱ्यांनी आता राज्यभर आंदोलन सुरू केलय. येत्या पंधरा तारखेनंतर काम बंद आंदोलनाचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आलाय... राज्यभरात जवळपास 32 हजार कंत्राटी कामगार आरोग्य सेवेत काम करतात.
पंधरा तारखेपर्यंत पगार झाला नाही तर काम बंदचा इशारा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी काम करणाऱ्या कामगारांचा पगार गेले तीन महिने झाला नसल्याने त्यांनी काळ्याफिती बांधून आंदोलन सुरू केल आहे. पगार न झाल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या 15 तारखेपर्यंत जर पगार झाला नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा या कंत्राटी कामगारांनी दिला आहे. या गोष्टीकडे सरकारचं लक्ष वळवण्यासाठी नऊ तारखेपासून 14 तारखेपर्यंत हे कंत्राटी कामगार काळ्या फिती लावून काम करत आहेत. मात्र त्यानंतरही सरकारनं याकडे लक्ष दिलं नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा या कंत्राटी कामगारांनी दिला आहे.
घरापासून कामावर जायला सुद्धा पैसे उरले नाहीत
याबाबत बारामती येथे संघटनेचे अध्यक्ष हर्षल रणवरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यभरामध्ये सरकारच्या आरोग्य विभागात 32000 कामगार काम करतात. यामध्ये डॉक्टर,नर्सेस, टेक्निकल, नॉन टेक्निकल स्टाप आहे. कोविड काळामध्ये या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असलेल्या या कामगारांनी आरोग्य खात्याला चांगलं सहकार्य केलं होतं.अगदी एखाद्याच्या घरातील व्यक्ती कोरोना बाधित रुग्णाला हात लावत नव्हते. पण आम्ही पुढे होऊन रुग्णांची सेवा केली. सध्या सुद्धा हे कंत्राटी कामगार इमर्जन्सी सेवा देत आहेत. बालकांचे तपासणी, लसीकरण ही कामे करत आहेत. आरोग्य संदर्भातील पूर्ण सेवा हे कामगार देत आहेत. शासनाने आमचा तीन महिन्याचा पगार दिला नाही, त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळेच आम्ही आता काळ्याफिती लावून काम करत आहोत. राज्यभरातील हे सर्व कंत्राटी कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आम्ही सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा देत आहोत. त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की आमचा फक्त पगार वेळेत करा. कारण आता घरापासून रुग्णालयापर्यंत येण्यासाठी देखील आमच्याकडे पैसे नाहीत. इतकी जर आमच्यावर म्हणजेच कोविड योद्ध्यांवर वेळ येत असेल तर शासनाने याकडे लक्ष द्यावे. अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष हर्षल रणवरे यांनी शासनाला केली आहे.