Type Here to Get Search Results !

जनसुरक्षा कायद्यास विरोध : ३ एप्रिल रोजी पत्रकारांची मुंबईत निदर्शने

 जनसुरक्षा कायद्यास विरोध :

३ एप्रिल रोजी पत्रकारांची मुंबईत निदर्शने



मुंबई : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणाऱ्या प्रस्तावित विशेष जनसुरक्षा विधेयकास एकजुटीने विरोध दर्शवण्यासाठी ३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी एक वाजता मुंबईतील पत्रकार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या परिसरात तीव्र निदर्शने करणार आहेत. मुंबईतील १० प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या "पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचा"च्यावतीने दुपारी १ वाजता हे आंदोलन होत असल्याची माहिती पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.


जनसुरक्षेच्या गोंडस नावाखाली राज्य सरकार लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच आक्रमण करू पहात आहे. या कायद्याचा फटका पत्रकार आणि प्रसार माध्यमांना सर्वाधिक बसणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी पुढाकार घेत कायद्याला ठामपणे विरोध करण्याचा भूमिका घेतली आहे. मुंबईतील दहा प्रमुख पत्रकार संघटनांची एक बैठक नुकतीच मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडली. या बैठकीत पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच स्थापन करून या व्यासपीठाच्या माध्यमातून कायद्याला विरोध करणारी चळवळ सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यानुसार मंचाच्यावतीने लवकरच राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्रकारांच्या तीव्र भावना त्यांच्याकडे व्यक्त करण्यात येणार आहेत.

 तसेच तुषार खरात आणि राज्यातील अन्य पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्यात येत असल्याची बाब देखील राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत तुषार खरात व इतर पत्रकारांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे. विविध पक्षांच्या प्रमुखांनाही भेटून त्यांनी जनसुरक्षा कायद्यास विरोध करणारी भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती केली जाणार आहे.

३ एप्रिलच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्यभरही पत्रकार रस्त्यावर उतरतील, त्याची तारीखही लवकरच जाहीर करण्यात येईल, असा इशाराही मंचाच्यावतीने एस.एम.देशमुख, संदीप चव्हाण यांनी दिला आहे.



३ एप्रिलच्या आंदोलनात मुंबईतील जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी व्हावे,असे आवाहन मंचाच्यावतीने करण्यात आले आहे.

पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच

मुंबई मराठी पत्रकार संघ 0 मराठी पत्रकार परिषद 0 मुंबई प्रेस क्लब 0 मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ 0 टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन 0 पुणे श्रमिक पत्रकार संघ ० बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट 0 बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ 0 मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशन ० मुंबई हिंदी पत्रकार संघ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies