पत्रकार तुषार खरात यांच्या अटकेचा मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध
जयकुमार गोरेंच्या विरोधात बातमी केल्याने पत्रकार खरात यांच्यावर एका पाठोपाठ एक गुन्हे
मुंबई :
खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा अत्यंत निंदनीय प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. "लई भारी" युट्यूब चँनलचे संपादक तुषार खरात या मालेतले ताजे बळी ठरले आहेत. तुषार खरात यांच्यावर विनयभंग, अँट्रॉसिटी, पाच कोटींच्या खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना अटकही करण्यात आली आहे.
तुषार खरात तुरूंगातून बाहेर येऊच नयेत हा तर कारवाई मागचा उद्देश आहेच त्याचबरोबर तमाम पत्रकारांवर दहशत बसविणे हा देखील हेतू आहे. याचा मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडिया परिषद तीव्र शब्दात निषेध करीत आहे.
जयकुमार गोरे यांच्या विरोधात बातमी केल्यानंतर लगेच तुषार खरात यांच्यावर एका पाठोपाठ एक असे गुन्हे दाखल झाले. अन्य प्रकरणात पोलीस ही तत्परता दाखवत नाहीत. हे संतापजनक असून सरकारने तुषार खरात यांच्यावरील हे खोटे गुन्हे रद्द करावेत आणि तुषार खरात यांची सुटका करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषद करीत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात लक्ष घालून खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांची गळचेपी होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंतीही एस. एम. देशमुख यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करावी अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.