नीरा येथील ग्रामपंचायत व्यापारी गाळ्यांच्या फेर वाटपासाठी उपोषण
जिल्हा परिषद कार्यालयासमोर करणार उपोषण
नीरा दि.१४
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरा ग्रामपंचायतीच्या व्यापारी गाळ्यांच्या वाटपामध्ये अनियमितता झाल्याचे म्हणत या गाळ्यांचे फेरवाटप करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र यानंतर या गाळ्यांच्या वाटपाला दिरंगाई होत असल्याचे म्हणत नीरा येथील तक्रारदार अन्वर शेख दिनांक १७ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. या संदर्भातील पत्र त्यांनी जिल्हा परिषदेकडे दिले असून याबाबतची माहिती त्यांनी आज शुक्रवारी माध्यमांना दिली
पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीकडे ५६ व्यापारी गाळे आहेत. या गाळ्यांचा संदर्भात अन्वर शेख यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी करून कार्यकारी अधिकारी यांनी हे गाळे वाटप करताना अनियमितता झाल्याचे म्हटलं होतं. यानंतर तत्कालीन व सध्याचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्याचबरोबर नीरा ग्रामपंचायतीच्या या व्यापारी गाळ्यांचे फेरवाटप( फेरलिलाव) केले जावे असे आदेश देखील देण्यात आले होते. मात्र याला आता वर्ष झाले तरी गाळ्यांचे फेरवाटप करण्यात आले नाही. याउलट जिल्हा परिषदेच्यावतीने त्यांनी दिलेला आदेश स्थगिती देण्यात आली आहे. ज्या गाळेधारकांनी बेकायदेशीरपणे गाळे ताब्यात घेतले आहेत
त्याच गाळेधारकांच्या सांगण्यावरून जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतःच दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली. यामुळे या गाळ्याचे फेरवाटप होणे लांबले आहे.तर कार्यकारी अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची फेर चौकशी लावली आहे. मात्र हा प्रकार म्हणजे वेळ काढूपणा असल्याचे म्हणत अन्वर शेख यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. जोपर्यंत या गाळ्यांच फेरवाटप होत नाही आणि फेरवाटप करण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार नाही. तोपर्यंत आपण जिल्हा परिषदेच्या समोर उपोषण आंदोलन करणार असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे नीरा येथील ग्रामपंचायत व्यापारी गाळ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे
गाळ्यांचा प्रश्न म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांच्या नरड्यात आडकलेले हाडूक......
नीरा ग्रामपंचायतीच्या या व्यापारी गाळ्यावर नीरा येथील मोठं राजकारण अवलंबून आहे.नीरा ग्रामपंचायतीचे 56 गाळे आहेत आणि या गाळेधारकांकडे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. त्यामुळे या गाळेधारकांवर कारवाई करण्यापेक्षा या गाळेधारकांची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही केला जात आहे. जिल्हा परिषदेचा आदेश फेरवाटपाच असला तरी यामुळे गाळेधारक नाराज होतील आणि त्याचा फटका पुढील ग्रामपंचायत निवडणुकीत बसेल या कारणाने गाळे धारकांच्या वाट्याला कोणीच जात नाही.आणि म्हणूनच गाळेधारक देखील निर्धास्त आहेत. यातील बरेच गाळेधारक ग्रामपंचायतीचे भाडे देखील भरत नाहीत. अशा थकबाकीदार गाळेधारकांना पाठीशी घालण्याचं काम ग्रामपंचायतीकडून नेहमीच होत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे गाळेधारकांचा प्रश्न म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही नरड्यात अडकलेले हाडूकच आहे ज्याला बाहेरही काढता येत नाही आणि गिळूनही टाकता येत नाही.