Type Here to Get Search Results !

केंद्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा करून तो देशभर लागू करावा : एस.एम.देशमुख यांची मागणी

 केंद्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा करून तो देशभर लागू करावा : एस.एम.देशमुख यांची मागणी 



मुंबई : 

      छत्तीसगढ येथील तरूण पत्रकार मुकेश चक्राकर यांची झालेली निर्घृण हत्त्या आणि देशातील पत्रकारांवरील वाढते हल्ले लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशभर पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. 


     भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत बातमी दिल्याबद्दल बिजापूर येथील रस्ता गुंतेदाराने (ठेकेदार) तरूण पत्रकार मुकेश चक्राकर यांची निर्घृण हत्त्या केली. त्या अगोदर महाराष्ट्रात देखील रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांना गाडीखाली चिरडून ठार करण्यात आले. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात देशात तब्बल २८ पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत. यामध्ये केवळ युपी, बिहारच नाही तर मध्यप्रदेश, झारखंड, पंजाब, गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये देखील पत्रकारांच्या हत्त्या झालेल्या आहेत.


       पत्रकारांवरील जीवघेणे हल्ले देखील वाढल्याने माध्यम जगतात मोठा असंतोष आणि असुरक्षिततेची भावना आहे. माध्यमं लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असतील तर त्यांना त्यांचे काम निर्भय वातावरणात  करता आले पाहिजे. त्यासाठी देशभरातील पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक आहे असे मत एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे. 


     महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपुर्वी पत्रकार संरक्षण कायदा केला पण त्याचं नोटिफिकेशन काढले गेले नसल्याने हा कायदाच अजून राज्यात अंमलात आलेला नाही. महाराष्ट्राच्या धर्तीवर केंद्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा केला तर देशातील पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळू शकेल असा विश्वास एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केला आहे. हा विषय लोकसभा आणि राज्यसभेत उपस्थित करून सरकारला कायदा करायला भाग पाडावे यासाठी मराठी पत्रकार परिषद राज्यातील काही खासदारांच्या भेटी घेणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.


         महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील स्वतंत्र पत्र पाठवून एस. एम. देशमुख यांनी राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याचे नोटिफिकेशन काढून तो तातडीने लागू करावा अशी विनंती केली आहे. महाराष्ट्रात कायदा आहे पण तो अंमलात आलेला नाही हे लक्षात आल्यानंतर राज्यातील पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले असल्याचा आरोप एस. एम. देशमुख यांनी केला आहे. सरकारने तातडीने कायदयाची अंमलबजावणी केली नाही तर राज्यातील पत्रकारांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही एस. एम. देशमुख यांनी दिला आहे. बुलढाणा येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीवर लगेच कारवाई करावी अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies