पुरंदरच्या तरुणाने शब्दबद्ध केले माणच्या धनगरी स्त्री ओव्यातील लोकतत्व
नीरा. दि.८
गुळुंचे (ता.पुरंदर) येथील प्रसिद्ध लेखक, कवी व संशोधक प्रवीण जोशी यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी हाती घेतलेले कार्य अखेर पूर्णत्वाकडे पोहचले आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील धनगर महिलांच्या शेकडो ओव्या त्यांनी शब्दबद्ध केल्या असून त्यातील लोकतत्व लवकरच वाचकांपुढे येणार आहे.
प्रवीण जोशी हे प्राथमिक शिक्षक असून त्यांनी १४ वर्षे माण तालुक्यातील वाघमोडेवाडी येथे सेवा बजावली. त्याकाळात विद्यार्थी विकासाचे अनेक उपक्रम राबवत गुणवत्तापूर्ण शाळेची पायाभरणी केली. कोरोना संकटकाळात त्यांनी ऑनलाईन पाठशाळा घेतली जिचा फायदा राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना झाला होता. त्यांच्या माणुसकीचा गाव, चिरंतन चिंतन, घरकुल, गल्हाटा, पनव्या या पुस्तकांनी वाचकांच्या मनात घर केले आहे. नुकतेच दुबई येथे पार पडलेल्या विश्व मराठी सृजन साहित्य संमेलनात त्यांच्या पुस्तकांचे कौतुक देखील करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले विद्यापीठात ते इ.स. १८०० ते इ.स. १९५० या दीडशे वर्षांच्या कालावधीत मराठी साहित्यावरील प्रबोधनाचा प्रभाव या विषयावर पीएच. डी पूर्णं करत आहेत.
धनगर समाजाच्या ओव्यांवरील या संशोधन ग्रंथातून साधारण १०० वर्षे मागील माण तालुक्यातील धनगर महिलांचे भावविश्व, स्त्री मनाचा हुंकार वाचकांपुढे उलगडला जाणार आहे. लोकसमजुती, लोकरिती, लोकमानस, लोकश्रद्धा समजून घेण्यासाठी देखील हा संशोधन ग्रंथ मैलाचा दगड ठरणार आहे. परिस पब्लिकेशन पुणे यांच्यामार्फत ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
कृषी, पशुधन, देवीदेवता, मानवी नातेसंबंध, विधी यांवरील शेकडो ओव्या शब्दबद्ध करण्यात आल्या आहेत. या संशोधनासाठी फुलाबाई मडके, अर्चना शिंगटे, विमल सजगणे, अक्काताई झिमल, अलका खताळ, नंदा वाघमोडे, शारदा कोकरे, कमल वाघमोडे, कमल खताळ, शर्मिला मडके, रेश्मा झिमल यांनी योगदान दिले आहे.
लोकसाहित्यात ओव्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. या ओव्या मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत राहिल्या. कालमानाने या ओव्यांच्या भाषेत, लयीत व रचनेत कमालीचे बदल झाले आहेत. हे बदल देखील या ग्रंथात विषद करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत नव्या पिढीने या ओव्या आत्मसात करण्याकडे पाठ फिरवल्याने हा साहित्यिक ठेवा भविष्यात दुर्मिळ होणार आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने धनगर महिलांची साहित्यिक अस्मिता जतन करण्याचा जोशी यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. मार्च महिन्यात हा संशोधन ग्रंथ वाचकांच्या भेटीला येणार असल्याचे परिस पब्लिकेशनचे गिरीश भांडवलकर यांनी सांगितले.
“लोकसाहित्यातून ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीचे अनेक अंदाज बांधणे सोपे जाते. एखाद्या प्रतिभासंपन्न कवीला लाजवतील अशा द्वीअर्थी, त्रिअर्थी ओव्या निरक्षर महिलांनी रचल्या व गाईल्या आहेत. अलंकार, रचना, प्रबोधन यादृष्टीने हा अमुल्य साहित्य ठेवा असल्याने संशोधन ग्रंथाला ‘अनर्घ’ नाव दिले आहे.” – प्रविण जोशी, लेखक व संशोधक
“धनगर स्त्रियांच्या मनाचे भावविश्व या ग्रंथातून ओव्यांच्या रूपाने पुढे येते. त्यानिमित्ताने मराठी भाषेतील हद्दपार होत असलेल्या अनेक जुन्या शब्दांचा संग्रह देखील नकळतपणे झाला आहे. मराठी साहित्यात हा संशोधन ग्रंथ मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.” – प्रा. कुंडलिक कदम, कार्याध्यक्ष, म.सा.प शिरूर शाखा.