मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर
निरेत या दिवशी अधिकचा आठवडे बाजार
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नीरा शहराचा आठवडे बाजार हा बुधवारी असतो. यावर्षी मकरसंक्रांतीचा सण मंगळवारी होत आहे. तर भोगीच्या सण सोमवारी आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.११) अधिकचा आठवडे बाजार भरविण्याचा निर्णय नीरा ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांनी दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील राख, कर्नलवाडी, गुळूंचे, पिंपरे (खुर्द), पिसुर्टी, जेऊर, मांडकी, बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर, निंबूत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, निंबुतछपरी, वाघळवाडी, वाणेवाडी, मळशी तर सातारा जिल्ह्यातील पाडेगाव, बाळुपाटलाचीवाडी, रावडी, कसुर, धायगुडेमळा, पिंपरे (बुदृक) आदी गावातील लोक निरेच्या आठवडे बाजारात खरेदी विक्रीसाठी येत असतात.
सोमवार (दि.१३) रोजी भोगीच्या सणाला घेवडा, पावटा, वाटाणा, गाजर, यांसह भाजिपाला आवश्यक असतो. तर, मंगळवार दि.१४ रोजी मकरसंक्रांतीचा सण असल्याने परिसरातील गावखेड्यातील लोकांना खरेदी करता येणे सोयीचे होण्यासाठी नीरा शहरातील बाजारतळावर शनिवार (दि.११)आठवडे भरणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे व दवंडी देऊन जाहीर केले आहे.
नीरा शहरात ग्रामपंचायत प्रशासनाने शनिवारी आठवडे बाजार भरविण्याच्या निर्णयाचे स्वागत व्यापाऱ्यांनी केले. यामुळे बाजारपेठेला चालणा मिळे, तसेच व्यावसायिकांना अधिकचा लाभ होईल अशी प्रतिक्रिया द न्युज मराठीला किराणा व्यावसायिकांनी बोलून दाखवली.