पत्रकार संरक्षण कायद्याची लवकरच नोटिफिकेशन काढणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करणार
मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत पत्रकार संरक्षण कायद्याची "लवकरच नोटिफिकेशन काढून कायदयाची अंमलबजावणी करण्यात येईल" असे आश्वासन दिले आहे.
२०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा झाला होता. मात्र त्याचे नोटिफिकेशन निघाले नव्हते. त्यामुळे कायदा झाला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेला नाही. आज गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी नंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत मराठी पत्रकार परिषदेचे मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके यांनी देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी "लवकरच नोटिफिकेशन काढून कायदयाची अंमलबजावणी करण्यात येईल" असे आश्वासन दिले.
एस.एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषदेने सतत बारा वर्षे लढा दिल्यानंतर राज्यात २०१७ मध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला होता. त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आणि कायदा गॅझेटमध्ये आला. मात्र त्याचे राज्य सरकारने नोटिफिकेशन न काढल्याने कायदा अंमलात आलेला नाही. त्यामुळे मागील काळात पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. ही बाब मराठी पत्रकार परिषदेचे मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
पत्रकार पेन्शन वाढीच्या संदर्भातही लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली आहे.