विठू माऊलीच्या पंढरीत ‘पांडूरंग’ वाळीत !
‘‘पंढरपुरचे विठ्ठल मंदीर हरिजनांना मोकळं व्हावं म्हणून मी मरायला उभा राहिलो आहे" या चळवळीत प्रमुखांचे स्मारक पंढरपूरातच अडगळीत.
पुणे :
मराठी पत्रकार परिषदेचे जेष्ठ मार्गदर्शक गो. पि. लांडगे नुकतेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी जे अनुभवलं व लिहिलं ते जशाच तसं घेऊन आलोय आपल्यासाठी.
गो. पि. लांडगे लिहितात 9 व 10 डिसेंबर रोजी माझे पंढरपुरला ठरवून जाणे झाले. श्री विठ्ठल रखुमाई मंदीरापासून जवळच असलेल्या संत तनपुरे मठात दोघा स्थानिक समाजसेवक, युवा पत्रकारांसोबत, साने गुरुजी यांच्या स्मारकाला भेट दिली. सुमारे 77 वर्षापूर्वी पंढरपुरच्या विठू माऊलीच्या मंदिरात दलितांना प्रवेश बंदी होती. बंदी उठवावी म्हणून मायमाऊली साने गुरुजींनी सामाजिक समतेची भगवा पताका फडकवणारा ग्रामीण भागात रुजलेल्या वारकरी संप्रदायाशी संवाद साधला. अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. आपली भूमिका समजावून सांगितली आणि दलितांना मंदीर खुले व्हावे म्हणून प्राणपणाला लावण्याचा निर्धार केला. संत गाडगे बाबांच्या प्रेरणेने कुशाबा तनपुरे महाराजांनी पंढरपुरात आपल्या मठातील जागा गुरुजींना उपोषणासाठी उपलब्ध करून दिली. गुरुजींचे उपोषण सुरु झाले.
तत्कालीन सनातन्यांनी ‘जावो साने भीमा पार, नहीं खुलेगा विठू द्वार’ अशा घोषणा देत विरोध केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी विनोबाजींनीही उपोषण करू नये म्हणून आग्रह धरला. परंतु गुरुजींचे म्हणणे होते की, ‘‘पंढरपुरचे विठ्ठल मंदीर हरिजनांना मोकळं व्हावं म्हणून मी मरायला उभा राहिलो आहे. गुरुजींच्या शब्दात पंढरपुर म्हणजे महाराष्ट्राचे हृदय, महाराष्ट्राच्या जीवनाची किल्ली, पंढरपुरची कळ दाबली तर महाराष्ट्रभर प्रकाश पडेल. या रुपानं महाराष्ट्रातील सर्व जीवनांतील अस्पृश्यता नष्ट व्हावी, दुष्ट रुढीची कुलुपं गळून पडावीत. मी माझ्या प्राणाचं तेल घालण्यासाठी उभा आहे.’’ असा निर्धार व्यक्त करीत सर्व लेकरांना देवाजवळ येऊ द्यावे म्हणून मंदीर व्यवस्थापनाकडे त्यांनी विनंती केली. अवघ्या महाराष्ट्रातून गुरुजींच्या भूमिकेला पाठिंबा मिळत गेला. अखेर या लढ्याला यश मिळाले, कायदा झाला. 24 नोव्हेंबर 2024 रोजी या घटनेला 77 वर्षे झाली.
साने गुरुजींनी दिलेल्या क्रांतीकारी लढ्याचे पंढरपुरात स्मारक व्हावे म्हणून दोन वर्षापूर्वी राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष साथी राजाभाऊ अवसक आणि साथींनी, ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या ठिकाणी साने गुरुजी उपोषणास बसले होते त्याच जागेवर तनपुरे महाराज मठामध्ये हे स्मारक उभारण्यात आले. ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते स्मारकांचे उद्घाटन झाले. साने गुरुजींचा सामाजिक समतेचा लढा येणाऱ्या पिढीला माहित व्हावा व पंढरपुर हे सामाजिक समतेच्या लढ्याचे आद्यपीठ व्हावं याच प्रामाणिक हेतूने राजाभाऊ अवसक आणि सहकाऱ्यांनी कष्टप्रत स्मारक उभे केलं. नक्कीच या श्रेयाचे राजाभाऊ आणि साथी मानकरी आहेत. राजाभाऊंच्या कष्टाला सलामच आहे.
गो. पि. लांडगे पुढे लिहितात, मी साने गुरुजींच्या खान्देशच्या कर्मभूमीतला माणूस, मला हे स्मारक पहाण्याची खूप उत्सुकता होती आणि ती संधी मी 10 डिसेंबर रोजी मिळविली. पण तेथे मला जे दिसलं ‘याची देही, याची डोळा’ जे अनुभवलं ते पाहून माझ्या आनंदावर विर्जण पडले. स्मारकाजवळ उभं राहून सुद्धा मला स्मारक सापडेना. मी राजाभाऊंना भ्रमणध्वनी लावला. त्यांच्याकडून माहिती मिळविली. राजाभाऊंनी ज्यांना भेटावयास सांगितले ती व्यक्ती प्रवेशद्वाराजवळच बसलेली होती. त्यांच्या देहबोलीवरूनच मी ओळखले की, त्यांना गुरुजीच समजले नसावे किंवा आस्था नसावी. त्यांनी फक्त स्मारकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याकडे बोट दाखविले. भाविक मोठ्या संख्येने तनपुरे महाराजांच्या मूर्तीच्या दर्शनाकडे जात होते. मीही तनपुरे महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले; तरी मला गुरुजींचे स्मारक दिसेच ना. पुन्हा खाली येऊन संबंधित ग्रहस्थांना विचारले तेव्हा त्यांनी बोट दाखवित सांगितले, ‘‘हे काय हो स्मारक, लगतच आहे.’’ मी पुन्हा वर गेलो तर गुरुजींच्या स्मारकाच्या दोन्ही बाजूचे प्रवेशद्वार कुजलेल्या दोरांनी, सडलेल्या बांबुंनी बांधलेले, ज्याला खान्देशच्या अहिराणी बोली भाषेत ‘वाढगं’ म्हणतात जेथे फाटक लाऊन गुरा-ढोरांना चारा-पाणी टाकून बंदीस्त केलेले असते तसं गुरुजींना बंदिस्त करण्यात आले आहे. सोबत असलेल्या दोन स्थानिक कार्यकर्ते, पत्रकार युवा मित्रांसह 77व्या वर्षी माझ्यात असलेल्या शक्तीचा वापर करून ते ‘वाढगं’ ढकलले आणि स्मारकाच्या आत प्रवेश केला आणि पाहिले तर गुरुजी एकटेच, सोबतीला त्यांच्या अंगाखांद्यावर धुळीचे साम्राज्य. भाविकांसाठी दोन्ही बाजूने गुरुजींच्या भेटीचे रस्ते बंद केलेले. खाली आलो त्या व्यक्तीला पुन्हा विचारले, काहो, गुरुजींच्या दर्शनाला भाविकांना बंदी केली आहे का? त्यावर त्याचं ‘‘पावित्र्य राखण्यासाठी आम्ही बंद ठेवतो’’ हे उत्तर एैकून मी अचंबित झालो आणि चिडही आली.
ज्या महापुरुषाने स्वत:चे प्राण पणाला लावून दलित भाविकांना विठोबांचे दर्शन खुले करून दिले. ज्यांच्या नावातच पांडुरंग आहे, त्या ‘पांडुरंगाचे’ (पांडुरंग सदाशिव साने) दर्शनासाठी भाविकांना ठरवून बंदी का? मला सर्वच संशय वाटतो. गुरुजींवरचा हा ठरवून तर सूड नाही ना? तुम्ही दलित शोषितांना मंदीर खुले केले मग आम्हीच तुम्हाला बंदीस्त करतो असा कुणाचा हेतू असेल का? अशी मला शंका आहे. जवळच असलेल्या मोठ्या झाडूसोबतचे लहान पिलु (बुडूक) सापडले आणि दोघा युवा पत्रकार मित्रांच्या सोबतीने माझ्या हातरुमालाने गुरुजींचा पुतळा स्वच्छ केला आणि जमिनीवरची धुळ झाडली. मी धुळेकर त्यामुळे मला ‘धुळ’ परकी नाही. मग मी स्मारकाला भेट दिली असे राजाभाऊंना फोनवरून कळविले. त्यावर भाऊ लगेच उत्तरले, ‘‘गोपीजी धुळ फार असेल?’’ यावरून राजाभाऊंनाही ते ज्ञात होते. अर्थात ही एकटी राजाभाऊंची जबाबदारी नाही. आपणच गुरुजींचे भक्त त्यांना सहकार्य करण्यास तोडके पडलो. गुरुजींचे दर्शन सहज होणार नसेल व पावित्र्य राखले जाणार नसेल ; तर मग स्मारक हवेच कशाला?
महाराष्ट्रभर पू. सानेगुरुजींच्या नावाने असंख्य शाळा पूर्वसुरींच्या कृपेने तिसऱ्या पिढीच्या ताब्यात आहेत. (आज तिसरी पिढी कुठल्या विचारधारेसोबत आहे हे ज्याने त्याने शोधावे) त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक रुपया ‘स्वेच्छा निधी’ घेतला तरी येथे एखाद्या काळजीवाहु व्यक्तीची नेमणुक करणे शक्य होईल. आपल्याकडे ‘गुरुमाऊली’ म्हणण्याचा प्रघात आहे. संत परंपरेत ज्ञानोबांना ‘माऊली’ म्हणत असत. त्यानंतर साने गुरुजी महाराष्ट्राची ‘मायमाऊली’ झाली. या माऊलीच्या दर्शनासाठी मी आसुसलो होतो. साने गुरुजींच्या विचारांच्या चाहत्यांनो, नेत्यांनो मला क्षमा करा, मला स्मारकावर साने गुरुजींचा दगडरुपी पुतळा दिसला. मातृहृदयी गुरुजी दिसले नाहीत. गुरुजी दिसण्यासाठी सामुहिकरित्या काही करता आले तर करावे ही नम्र प्रार्थना. गुरुजींच्याच शब्दात-
‘‘जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा,
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे’’.
- गो. पि. लांडगे,
ज्येष्ठ पत्रकार, धुळे
मो. 94227 95910