संवेदना बोथट होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे ; डॉ. संदीप सांगळे.
प्रविण जोशी यांच्या पनव्या कादंबरीचे नीरा येथे प्रकाशन
पुरंदर :
प्रविण जोशी यांची 'पनव्या' कादंबरी हा मैलाचा दगड ठरेल. नंदीवाल्या समाजाची बोलीभाषा व भटक्या जमातीचा संघर्ष दाखवणारी ही कादंबरी अस्वस्थ करून सोडते. ज्या समाजाच्या संवेदना जागृत आहेत त्या समाजात समतेसाठी, दुःख निर्मूलनासाठी प्रयत्न होतात आणि ते राष्ट्र प्रगती करते. परंतु, भौतिक संपन्नता संवेदना बोथट करत असेल तर हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अस्वस्थ आणि वेडं झाल्याशिवाय समाजाला दिशा देता येत नाही. " असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांनी केले.
नीरा (ता. पुरंदर ) येथील ग्रामपंचायत सभागृहात प्रसिद्ध ग्रामीण लेखक व कवी प्रविण जोशी यांच्या पनव्या या कादंबरीचे प्रकाशन डॉ. सांगळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. महादेव रोकडे, कवयित्री रुपाली फरांदे, गिरीश भांडवलकर, कांचन निगडे, राजेंद्र बरकडे, दादासाहेब गायकवाड, बाळासाहेब ननावरे, अमृता निगडे, पी. डी. कांबळे आदी उपस्थित होते.
डॉ. सांगळे म्हणाले, "समाजात आहे रे वर्गाने नाही रे वर्गाच्या कल्याणासाठी झटले पाहिजे. तरच सामाजिक समातेचे तत्व वृद्धिंगत होईल. आपण भारतीय म्हणून हे आपले कर्तव्य आहे. भटक्या जमातीतील नंदीबैल घेऊन फिरणाऱ्या जमातीतील स्त्री जीवनाचे चित्रण लेखकाने बरकाईने व अभ्यासपूर्ण केले आहे."
यावेळी दादासाहेब गायकवाड म्हणाले, "या जमातीचे प्रश्न जोशी यांनी मांडले आहेत. पण, ते सोडविण्याची जबाबदारी आपली आहे. ओळखपत्र, घरांना जागा व त्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत."
कांचन निगडे, राहुल शिंदे, केशव गोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्रा. कुंडलिक कदम होते. भरत निगडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रविण जोशी यांनी मानले.
"प्रविण जोशी हा जातीने ब्राम्हण असला तरी कर्माने बहुजन आहे. भटक्या जमातींशी एकरूप झालेला हा लेखक, कवी जातीवादाला कडाडून विरोध करतो. समतेचा संदेश देतो, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमातीतील देऊळवाले, नंदीवाले, मसनजोगी यांच्या कल्याणासाठी झटणारा हा आधुनिक कर्मयोगी आहे."
- डॉ. महादेव रोकडे
मराठी विभागप्रमुख, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय.
"कादंबरी दर्जेदार असून तिचा विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा. या कादंबरीने या जमातीची बोली प्रथमच साहित्यात आली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर झालेले या कादंबरीचे प्रकाशन ही अमूल्य भेट आहे. "
- प्रा. कुंडलिक कदम
महाराष्ट्र साहित्य परिषद
पदाधिकारी.