पुरंदर-हवेलीमध्ये तिरंगी लढत : आश्चर्यकारक निकाल लागू शकतो.
संजय जगताप, विजय शिवतारे, संभाजी झेंडे आखाड्यात : दिग्गजांच्या तलवारी म्यान : माघार घेतलेले प्रचारात फिरकेनात.
पुरंदर :
पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी अजित पवार यांच्यामध्ये काट्याची लढत रंगणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे संभाजी झेंडे यांचा अर्ज माघारी घेण्यात आला नाही. त्याचबरोबर महायुतीतून शिंदे शिवसेनेचे विजय शिवतारे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महायुतीतून मैत्रीपूर्ण लढत होणार, हे आता स्पष्ट झालेले असून. माघारी घेतलेले नेते नाराज दिसून येत आहेत. त्यामुळे तिरंगी लढतीत आश्चर्यकारक निकाल लागू शकतो अशी चर्चा पुरंदरच्या गावखेड्यात होत आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने कॉग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांचे पहिल्या यादीत नाव आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची उमेद वाढली. शिवसेना उबाठा गटाचे शंकर हरपळे व अभिजित जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण पक्षाने अधिकृत घोषणा न केल्याने सोमवारी आपले अर्ज माघारी घेत थेट संजय जगतापांना पाठिंबा दर्शवत प्रचारात सहभागी झाले. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, महिला अध्यक्ष गौरीताई कुंजीर, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, जेष्ठ विजय कोलते, बबूसाहेब माहुरकर, सुदामराव इंगळे, दत्ता चव्हाण आदिंनी संजय जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात सहभाग घेतलय.
महायुतीने पुरंदर विधानसभेची उमेदवारी माजी राज्यमंत्री शिवसेनेचे विजय शिवतारे यांना दिली. परंतु त्याचवेळी पुरंदरमधून शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षात घेऊन घड्याळ चिन्हावर उमेदवारी दिली. महायुतीमध्ये यामुळे संघर्ष होताना पाहायला मिळत आहे.
उमेदवारी माघारी घेण्याच्या वेळेपर्यंत ३३ उमेदवारी अर्जापैकी १७ उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. आता १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. पक्षांचे एबी फॉर्म नसलेल्या उमेदवारांनीही आपले अपक्ष अर्ज ही माघारी घेतले आहेत.
पुरंदर विधानसभेच्या आखाड्यातून भाजप नेते संदीप ऊर्फ गंगाराम मारुती जगदाळे, जालिंदर सोपानराव कामठे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते प्रा. दिगंबर गणपत दुर्गाडे, दत्तात्रय मारुती झुरंगे यांच्यासह १० दिग्गज उमेदवारांनी आपली तलवार म्यान केली आहे. यातील दत्ता झुरुंगे व गंगाराम जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अजित पवारांचे खंदे समर्थक दिगंबर दुर्गाडे मंगळवारी दुपारपर्यंत झेंडे यांच्या जवळ ही फिरकले नसल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते जालिंदर कामठे यांंनी ही आपली भुमिका स्पष्ट केली नसल्याने ते ही संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुरंदरचा वेगळा निकाल लागला तर आश्चर्य वाटायला नको.