Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना वृत्तसंकलनासाठी ओळखपत्र द्या मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेची मागणी एस.एम.देशमुख यांचे निवडणूक आयोगाला पत्र

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना वृत्तसंकलनासाठी ओळखपत्र द्या

मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेची मागणी

एस.एम.देशमुख यांचे निवडणूक आयोगाला पत्र




मुंबई दि. १५ प्रतिनिधी


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान व मतमोजणीचे वृत्तसंकलन करण्यासाठी मुद्रीत व इलेक्ट्रानिक मीडियाच्या प्रतिनिधींसोबत डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना निवडणूक आयोगाने ओळखपत्र (प्रधिकारपत्र) द्यावे, अशी मागणी मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेच्यावतीने भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी ई-मेलद्वारे पत्र पाठवले आहे. 


एस.एम.देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त या नात्याने आपण १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे, आणि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत जास्तीतजास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून करण्यात येणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वापरला जातो. तसेच मुद्रीत, इलेक्ट्रानिक, डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी देखील यासाठी प्रयत्न करीत असतात,’ असे देशमुख यांनी पत्रात म्हंटले आहे. 


‘निवडणूक आयोगाच्या मतदारांसाठी उपयुक्त असणाऱ्या बातम्या ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुद्रीत, इलेक्ट्रानिक मीडिया सोबतच डिजिटल मीडियाची भूमिका खूपच महत्त्वपूर्ण आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत वृत्तांकन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रधिकारपत्रे देण्यात येते, तेव्हा केवळ मुद्रीत व इलेक्ट्रानिक मीडियाच्या प्रतिनिधींना ते दिले जातात. डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना मतदान आणि मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी वृत्तांकनासाठी प्रधिकारपत्र दिले जात नाही. त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही निवडणूक विषयी आवश्यक माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यास डिजिटल मीडिया प्रतिनिधींना अडचणी येतात. निवडणूक आयोग स्वतः मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया, यु ट्यूब यासारखी माध्यमे वापरत असल्याने डिजिटल मीडियाची ताकद नेमकी किती आहे, याची कल्पना निवडणूक आयोगाला आहेच,’ असेही देशमुख यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.  


‘यासर्व गोष्टींचा विचार करून कृपया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुद्रीत, इलेक्ट्रानिक मीडिया सोबतच डिजिटल मीडिया (न्यूज पोर्टल, युट्यूब न्यूज चॅनल) यांनाही वृत्तसंकलन करण्यास ओळखपत्र (प्रधिकारपत्र) द्यावे, अशी मागणी मराठी पत्रकार परिषद, मुंबई आणि या संघटनेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषद  यांच्या वतीने करण्यात येत असून आपण आमच्या मागणीचा विचार करून योग्य त्या सूचना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा निवडणूक अधिकारी यांना द्याव्यात,’ अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies