मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने प्रविण जोशी यांच्या 'पनव्या' कादंबरीचे प्रकाशन
पुरंदर :
मौजे गुळुंचे (ता. पुरंदर ) येथील प्रसिद्ध ग्रामीण लेखक व कवी प्रविण अशोकराव जोशी यांच्या पनव्या या कादंबरीचे प्रकाशन मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने येत्या (ता. 5) नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. नीरा शिवतक्रार (ता. पुरंदर ) येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
नंदीबैलाचा खेळ करणाऱ्या मेढंगी जोशी या भटक्या समाजातील स्त्री जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. स्वातंत्र्योत्तर काळ ते आजातगायत या कालखंडात या जमातीला करावा लागणारा संघर्ष, त्यांच्या व्यथा, वेदना, अडचणी या कादंबरीत लेखक प्रविण जोशी यांनी रेखाटल्या आहेत. कादंबरीचे कथानक काल्पनिक असले तरी वास्तवाला भिडण्याचे सामर्थ्य या कथानकात असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिरूर तालुक्याचे अध्यक्ष कुंडलिक कदम यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. अध्यक्षस्थानी साहित्य परिषदेचे डॉ. कुंडलिक कदम तर ज्येष्ठ साहित्य समीक्षक व इंद्रायणी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. विजयकुमार खंदारे उपास्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत. टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. महादेव रोकडे पुस्तक परिचय करून देणार आहेत.
तसेच राज्य मराठी पत्रकार संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख भरत निगडे, जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर यांसह ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिनकर गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत सभागृहात प्रकाशन सोहळा पार पडणार असून साहित्यरसिकांनी आवर्जून उपास्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कांबळे, आदित्य कोंडे, प्रविण ढावरे यांनी केले आहे.