एसटीचे प्रवाशी 'ना घर का न घाटका'
एसटी महामंडळाच्या वाहक चालक कर्मचाऱ्यांचा बंद. अवैध प्रवासी वाहतूक जोमात, प्रवाशांची गर्दी
पुरंदर :
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला बंद आज मंगळवारी सकाळपासून सुरू झाला आहे. या संपाची निरा बसस्थानकावर सकाळपासूनच विद्यार्थ्यांना व प्रवाशांना झळ सोसावी लागत आहे. सकाळी मुक्कामी असलेल्या एसटी बस आगाराकडे जाण्याच्या दरम्यान प्रवाशांना वाहतूक करून गाव खेड्यातून निरा शहरात सोडले आहे. मात्र, येथून पुढचा प्रवास करण्यासाठी एसटी बसत नसल्याने प्रवासी 'ना घर का न घाटका' अशी अवस्था झाली आहे.
पुरंदर तालुक्यातील निरा हे गाव खेड्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. १० ते १२ गावांतून दररोज प्रवासी निरा बसस्थानकावर पुढील प्रवासासाठी येत असतात. निरा येथून बारामती, इंदापूर, फलटण, सातारा, पुणे, मुंबई, भोर, वेल्हा, खंडाळा या चोहबाजुंकडून जाण्यासाठी एसटी बस मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे गाव खेड्यातील मुक्कामी एसटीने प्रवासी व विद्यार्थी निरा बस स्थानकापर्यंत येत असतात.
आज एसटीचा संप असल्याचे मुक्कामी एसटी वाहक व चालकांनी प्रवाशांना गावातच कल्पना देणे गरजेचे होते. ते न करता गाव खेड्यातील प्रवाशांना अंधारात ठेवून निरा बस स्थानकापर्यंत आणून सोडले व त्यानंतर ते मुक्कामी आपापल्या आगाराकडे निघून गेले. निरा येथून मोठ्या प्रमाणावर बारामतीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या असते. या विद्यार्थ्यांनाही या संपाचा फटका बसत आहे. पहाटे रात्री मुक्कामी असणाऱ्या बारामती आगाराच्या चार बस पहाटे साडेपाच वाजल्यापासून एकेक करून आपल्या नियोजित वेळेप्रमाणे निघून गेल्या. मात्र, आठ नंतर एकही बस या निरा बस्थानकातून बारामतीकडे गेली नाही. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी निरा बस स्थानकावर खोळंबून आहेत.
काही विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात महत्त्वाचे काम असल्याने, पदरमोड करून अवैध प्रवासी वाहतूक जीप, टेम्पो, इको या वाहनातून ते दाटीवाटीने प्रवास करत आहेत. या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडूनही अव्वाच्या सव्वा दर आकारला जात आहे. यामुळे हे विद्यार्थी आता आर्थिक बुर्दंड सोसत आहेत. याबाबत एसटी महामंडळ यापुढे कोणती भूमिका घेत आहेत याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.