श्री क्षेत्र जेजुरी गडावर पुरंदरच्या सवंगड्यांनी केले वृक्षारोपण
जेजुरी दि.२४(वार्ताहर)
श्री क्षेत्र जेजुरी (ता. पुरंदर) येथील गड परिसरात पुरंदर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये कला विभागात सन १९९२ ते ९४ साली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या जिव्हाळा मित्र परिवाराच्या वतीने वरुणराजाच्या कृपावर्षावात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जिव्हाळा मित्र परिवाराच्यावतीने मल्हार गडावर उत्कृष्ट प्रकारची देशी झाडे लावून, त्यांना काठीचा आधार बांधून पाण्यासाठी गोल आळीवाफे बनविण्यात आले होते.
वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन किशोरी ताकवले, स्वाती गिरमे, निशिगंधा म्हेत्रे, सुनीता गाडेकर, शबाना शेख, राजश्री झेंडे, अश्विनी कादबाने, अनिता भोंगळे, कल्पना कादबाने, कल्पना गिरमे, स्वाती कटके, गणेश म्हेत्रे, हनुमंत लवांडे, संतोष लोणकर, संतोष गिरमे, सुनील लोणकर, सतिश शिंदे, विजय कुंजीर, दिलीप कामठे, दादासाहेब कटके, धनंजय गाडेकर, रघुनाथ ढवळे, कैलास भोसले, राजेंद्र कुंजीर, महेश कुंजीर, दत्तात्रय गायकवाड, भाऊसाहेब जगताप, अशोक जगदाळे, विलास सणस, फारुक मणेर, संतोष वारे, रविंद्र कटके, बाळासाहेब कटके यांनी केले.
वृक्षारोपण कार्यक्रमाच्या मुख्य संयोजक प्रा.किशोरी ताकवले म्हणाल्या सध्या सोशल मीडियाच्या जमान्यामुळे जुने वर्गमित्र मैत्रिणी एकत्र येत आहेत.गप्पा गोष्टी, आनंदाच्या, सुखदुःखाच्या देवाण-घेवाणीनंतर पार्टी किंवा स्नेहभोजन हे प्रत्येक ग्रुपचे ठरलेलेच आहे. पण हे करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी पुरंदर ज्युनिअर कॉलेजच्या १९९२- ९४ च्या कला शाखेच्या वर्गमित्र-मैत्रिणींनी वृक्षारोपणाचा विचार मांडला. वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त हे मित्र-मैत्रिणी एकत्र भेटत होते. पण एकत्र भेटण्यामधून काहीतरी सामाजिक बांधिलकी जपावी. ३४ वर्षांनी एकत्र आल्यानंतर आपल्या मैत्रीची एक आठवण म्हणून वृक्ष लागवडीचा उपक्रम करावा ही कल्पना माझ्या मनात आली. ती सर्व मित्र मैत्रिणींना बोलून दाखवली. अनेकांच्या मनात याबद्दल जाणीव होतीच. पण प्रत्यक्ष कार्यवाही होत नव्हती. स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून जेजुरी गडावर मार्तंड देव संस्थान ट्रस्ट यांच्या मार्गदर्शन व मदतीतून वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपणासाठी लायन रघुनाथ ढोले यांच्या रोपवाटिकेमधून अलका कुंभारकर व पोपटराव चौधरी यांनी रोपांची उपलब्धता करून दिली. संतोष गिरमे , हनुमंत लवांडे आणि राजश्री झेंडे यांच्या सहकार्याने रोपांची जेजुरी गडापर्यंत वाहतूक करण्यात आली. झाडांच्या वाढीसाठी ह्युमिक ऍसिड, आधारासाठी काठया सुतळी या सर्वांची उपलब्धता कल्पना गिरमे आणि राजेंद्र कुंजीर यांनी केली. जेजुरी गडावर खड्डे खोदण्यासाठी जेसीबी आणि झाडांसाठी माती संतोष गिरमे यांनी प्रयत्नपूर्वक मिळवली.
सर्व मित्रमंडळी झेंडावंदनाचा राष्ट्रीय कार्यक्रम झाल्यानंतर जेजुरी गडावर वृक्षारोपणासाठी हजर झाली. १०० रोपट्यांचे रोपण जेजुरी गडाच्या पूर्व बाजूला करण्यात आले. देव संस्थांनने झाडांची पुढील निगा राखण्याचे आश्वासन दिले.
त्यासाठी पाण्याची टाकी व पाईपची व्यवस्था करण्याचे जबाबदारी मुख्य विश्वस्त मंगेश घोणे,सतीश घाडगे व गणेश ढिकले यांनी घेतली आहे. तसेच या ग्रुपने महिना दोन महिन्यांनी येऊन वृक्ष संवर्धनाचे ही नियोजन केलेले आहे. सध्या जेजुरी गडावर पाऊस चांगला पडत असल्यामुळे लावलेली झाडे चांगली येतील अशी सर्वांना आशा आहे.