निरा देवघर धरणातून विक्रमी विसर्ग तर भाटघर धरणाचे स्वयंचलित ४५ दरवाजे उघडले
धरणातून १८ हजार क्युसेक्सने विसर्ग
पुणे :
निरा देवघर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून सकाळी ८:०० वा. धरण ९४ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणामध्ये सुरू असणाऱ्या येव्याचे प्रमाण लक्षात घेता निरा देवघर धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्र द्वारे सुरू असणाऱ्या ७५० क्युसेक विसर्गामध्ये वाढ करून ठीक सकाळी ९:०० वाजता सांडव्या द्वारे २ हजार ६५३ क्युसेक असा एकूण ३ हजार ४०३ क्युसेक विसर्ग नदी पात्रामध्ये सुरू करण्यात येत असुन भाटघर धरणाचे ४५ दरवाजे स्वयंचलित उघडले असून धरणातून १८ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात असल्याची माहिती पुणे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंतांनी दिली आहे.
शुक्रवारी बारा वाजता निरा खोऱ्यातील भाटघर धरणात ९७.५० टक्के पाणीसाठा झाल्याने १८ हजार क्युसेक्सने, निरा देवघर धरणात ९४ टक्के पाणीसाठा झाल्याने ३ हजार ४०३ क्युसेक्सने, गुंजवणी धरणात ८४.४८ टक्के पाणीसाठा झाल्याने २५० क्युसेक्सने तर वीर धरणात ९५.६८ टक्के पाणीसाठा झाल्याने १५ हजार १६१ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. आज दिवसभर निरा नदीपात्र दुथडी भरून वाहणार असल्याने. नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे हे सांगण्यात आले आहे.