आळंदीत क्रांतिकारकांच्या दोन हजार छायाचित्रांचे भव्य मोफत प्रदर्शन
१५ ऑगस्ट दिनी शालेय मुले पालक यांना आवाहन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने प्रणित कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे अंतर्गत ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांती मंदिर’ असे ९४८ दिवसांच्या परिक्रमेंतर्गत २ हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्रांच्या भव्य प्रदर्शनाचे मोफत आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, आळंदी जनहित फाउंडेशन, आळंदी यांचे वतीने आळंदी देवस्थानचे सहकार्याने श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी दिली.
प्रदर्शनाचे उद्घाटन १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी नऊ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ श्री राजेंद्र उमाप, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख श्री योगी निरंजन नाथजी, विश्वस्त डॉ. श्री भावार्थ देखणे, देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवरांचे उपस्थितीत होणार आहे.
देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने लिखित १०,००० क्रांतिकारकांची माहिती देणारा देशभक्तकोश तसेच २००० क्रांतिकारकांच्या छायाचित्राचे प्रदर्शन व अन्य दुर्मिळ डिजिटल ठेवा या ठिकाणी मोफत पाहण्यास तसेच वेबसाईटवर देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील २००० क्रांतिकारकांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे मोफत प्रदर्शन दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, आळंदी देवाची येथे सकाळी ९. ०० ते सायंकाळी ७.०० वाजे पर्यंत आयोजित केलेले आहे.
या प्रदर्शनात २ हजार ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांची सविस्तर माहिती प्रदर्शनातून देण्यात येत असल्याचे संयोजक अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ७५ फोटो वेगवेगळ्या माध्यमांच्या आकारातून साकार करण्यात आले आहेत. हे सर्व पाहण्याची सुवर्णसंधी आळंदी मंदिरात मिळणार असून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने यांनी केले आहे. आळंदी परिसरातील शालेय मुलांनी पालकांसह तसेच नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन छायाचित्र प्रदर्शन पाहण्यास मिळालेल्या पर्वणीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.