पुरंदरच्या दक्षिण पूर्व भागातील सर्वांत उंच कळस कोसळला.
दमदार पावसाचे पाणी कळसात मुरल्याने २० वर्षांपूर्वीचा कळस कोसळला.
पुरंदर :
पुरंदरच्या दक्षिण पूर्व भागाला गेली दोन दिवसांपासून दमदार पाऊस बरसत आहे. या पावसाचा फटका पिसुर्टी गावच्या ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराच्या कळसाला बसला आहे. २० वर्षांपूर्वी बांधलेले या भागातील सर्वात उंच पिसुर्टी येथील भैरवनाथाचा कळस मंगळवारी रात्री कोसळला. सततच्या जोरदार पावसाचे पाणी कळसात मुरल्याने कळस कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
पिसुर्टी ग्रामस्थांनी २००१ साली निश्चय केला होता सर्वात उंच कळस आपल्या भैरवनाथ मंदिराचा असावा. त्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित येत सलग चार वर्षे सत्तर लाख रुपये लोकवर्गणीतून व श्रमदानातून तब्बल ११० फुटी उंचीचा भव्यदिव्य कळसाचे काम केले होते. २००५ साली कळसाचे काम पुर्ण झाले. प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहणाचा कार्यक्रमही भव्यदिव्य झाला होता. याच मंदिराच्या सभामंडपात गावकरी आपल्या मुला मुलींचे विवाह पार पाडतात. पंढरपूर पालखी महामार्गावरून सहज हा कळस नजरेस पडे. हा अती उंच कळस पिसुर्टी गावची ओळख निर्माण करत होता. मंगळवारी रात्री तीनच्या सुमारास हा कळस निम्या भागातून कोसळला. कळस कोसळल्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.
या गावात मोठ्याप्रमाणावर डि.जे.चा दणदणाट असतो. लग्न, वरात, समाजसुधारकांच्या जयंती उत्सव, सार्वजानिक उत्सवांमध्ये किंवा इतर शुभकार्यावेळी शांत संगीत न लावता डि.जे.चा दणदणाट कायम असतो. रात्री उशिरापर्यंत डि.जी. चा आवाज मर्यादेपेक्षा जास्त सोडला जातो. आवाजा बाबत कोणी हटकल्यास त्याला प्रखर विरोध केला जातो. पिसुर्टी गावातील बहुतांश घरांना या कर्णकर्कश डि.जे.च्या आवाजामुळे तडे गेलेले दिसून येतात. असा डि.जे.चा दणदणाट कितेक तास मंदिर परिसरात नियमित असतो. त्यामुळे मंदिराच्या कळसाला तडे गेलेले असावेत असा ही अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.