शिक्षण सप्ताहात रमले फलटण तालुक्यातील विद्यार्थी
ता.
राज्य शासनाकडून सोमवार (दि.२२) ते रविवार (ता.२८) या कालावधीत शिक्षण सप्ताह राबविण्यात येत आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम घेतले जात असून फलटण तालुक्यातील विद्यार्थी उपक्रमात दंग आहेत. गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह उत्साहात सुरू आहे.
अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी व्हावी यासाठी शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांच्या भावात्मक, क्रियात्मक व बोधात्मक पैलूंच्या विकासासाठी हा अभिनव उपक्रम सुरू आहे. या अंतर्गत अध्ययन - अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, शालेय पोषण दिवस, समुदाय सहभाग दिवस अशी सप्ताहाची विभागणी करण्यात आली आहे.
प्रत्येक दिवशी नवा उपक्रम असल्याने विद्यार्थी उपक्रमात हिरिरीने सहभागी होताना दिसत आहेत. ठसेकाम, चित्रकला, मृदाकाम, चिकटकाम यात विद्यार्थी मग्न होत आहेत. शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत. साहित्य पेट्यांतील साहित्याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली जात आहे. बैठे खेळ कॅरम, बुद्धिबळ खेळण्यात मुलांना निराळीच मजा मिळत आहे. संख्याज्ञान, शब्दकोडी सरावासाठी दिली जात आहेत.
शिक्षण विभागाचे अधिकारी शाळांना भेटी देत असून सप्ताहाचा आढावा घेत आहेत. विविध उपक्रमांचे फोटो अपलोड करण्यासाठी शासनाकडून लिंक देण्यात आली आहे. त्यामुळे रोजच्या उपक्रमांचा आढावा जिल्हा शिक्षण विभागाला रोज प्राप्त होत आहे. दरम्यान, अतिवृष्टीने शाळांना सुट्टी देण्यात आली असल्याने उपक्रमात थोडा व्यत्यय येणार असला तरी मुले मात्र उपक्रमातील कृतींनी आनंदात आहेत.
"शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू असून मुले आनंदाने सहभागी होत आहेत. कौशल्य विकासाची नवी दृष्टी यामुळे मुलांना मिळत आहे."- बापूराव गायकवाड, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा पाडेगाव.
"तालुक्यातील सर्व शाळा या उपक्रमात सहभागी आहेत. मुलांच्या चिकित्सक वृत्तीला खतपाणी घालणारा हा उपक्रम आहे. नवीन कौशल्ये व तंत्रे विद्यार्थी प्राप्त करत आहेत. विद्यार्थी कृतिशील राहत असल्याने कृतीतून आनंद मिळवत आहेत."- बन्याबा पारसे, शिक्षणविस्तार अधिकारी.