वीर मधून ३२ हजाराने तर गुंजवणीतून ४ हजार क्युसेक्सने विसर्ग
वीर धरणातून दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच विसर्ग
पुरंदर :
नीरा नदीच्या गुंजवणी, नीरा देवघर,भाटघर सह वीर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने सर्व धरणे मिळून ६९.२५ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर वीर धरणात पाणी येण्याचे प्रमाण वाढते असल्याने तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच ३२ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
बुधवारी दिवसभर व गुरवारी रात्रभर धरण क्षेत्रातील पावसाचा जोर वाढत असून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वीर धरणाची पाणी पातळी ५७९.३० मिटर झाली असून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे २३ हजार १८५ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. आता दुपारी दिड वाजता तो वाढवून ३२ हजार ४५९ क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. गुंजवणी धरणातून ४ हजार ३६९ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.
पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. तरी सर्वांना विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील असे आवाहन नीरा उजवा कालवा विभाग कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
नीरा खोऱ्यातील भाटघर धरण ६७.०४ टक्के, नीरा देवघर धरण ६०.०७ टक्के, वीर धरण ८५.५५ टक्के तर गुंजवणी धरण ७१.०१ टक्के भरले आहे. नीरा खोऱ्यातील या चारही धरणात एकुण ३३.४७० टिएमसी म्हणजे ६९. २५ टक्के पाणीसाठा झाला आहे.