गल्हाटा काव्यसंग्रहाचे २३ जून रोजी नीरा येथे होणार प्रकाशन
ता.
प्रसिद्ध ग्रामीण लेखक, कवी प्रविण जोशी यांच्या आगामी गल्हाटा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार ता.२३ जून रोजी सकाळी १० वा. ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे.
गल्हाटा हे बहुचर्चित पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार असून डॉ. सबनीस यांना ऐकण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
राजकारण, शिक्षण, समाजव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था यातील सावळा गोंधळ व अव्यवस्था यांवर सडकून टीका करणारे पुस्तक वाचकांना दिशा देणारे ठरेल असा विश्वास आहे. आदिवासी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा तसेच प्रसिद्ध लेखिका, कवयित्री व गोंडी भाषेच्या अभ्यासिका, संशोधिका उषाकिरण अत्राम यांनी पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. तर ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित होत असल्याने दोन दिगग्ज व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींचा कौल मिळालेले हे पुस्तक दिशादर्शक ठरेल असा विश्वास प्रविण जोशी यांनी व्यक्त केला.
प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक डॉ.दिनकर गायकवाड, डॉ. प्रदीप पाटील तसेच डॉ. महादेव रोकडे, डॉ. विश्वास शेवते, डॉ. वैजनाथ राख हे पुण्यातील महाविद्यालयांचे मराठी विभागांचे प्रमुख कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. कुंडलिक पारधी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे संशोधक व लेखक संदीप तापकीर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
लेखक व कवी अनिल कदम हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. येथील नीरा- शिवतक्रारच्या ग्रामपंचायत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून रसिक वाचकांनी पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावावी असे आवाहन आयोजक आदित्य कोंडे, दादा काशीद, अमोल निगडे यांनी केले.