Type Here to Get Search Results !

शेषनाग आणि डाळिंबांची 'दगडूशेठ' गणपती मंदिरात आकर्षक आरास

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला बाप्पांचा पाताळातील अवतार असलेला शेषात्मज गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंदिरात फुलांच्या शेषनागाची आणि डाळिंबांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले. सोमवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर सकाळी ४ ते ६ यावेळेत गायक राहुल एकबोटे यांनी स्वराभिषेकातून आपली गायनसेवा अर्पण केली. सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत गणेशयाग, दुपारी १ ते ३ सहस्त्रावर्तने आणि रात्री ९ ते ११ गणेशजागर देखील पार पडला. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले. श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies