Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्र्यानी दुष्काळ परिस्थिती उपाययोजनाबाबत बैठक घ्यावी : शरद पवार यांची मागणी

विशेष प्रतिनिधी नीरा : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत आहे. यासाठी गांभीर्याने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्राद्वारे केली आहे. शरद पवार यांनी १२ आणि १३ जून रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती इंदापूर आणि दौंड तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. अल्प पर्जन्यमान असलेल्या ह्या भागातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यशासनाने प्रामुख्याने पुरंदर उपसा सिंचन योजना, गुंजवणी प्रकल्प, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना हाती घेतल्या आहेत. मात्र दौऱ्यावेळी शेतकरी- ग्रामस्थांशी संवाद साधला असता सदर योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनेक समस्या असल्याचे शरद पवार यांना दिसून आले. जनसंवादावेळी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा या करिता ग्रामस्थांनी मागण्यांसोबत काही उपाययोजना देखील शरद पवार यांच्याकडून सुचवण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपणास विनंती की, आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोनही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद व जलसंधारण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन व्हावे. उक्त बैठकीस संबंधित विभागाचे सचिव व अधिकारी यांना हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात व स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे. सदर बैठकीवेळी दौऱ्याप्रसंगी निदर्शनास आलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासंदर्भात चर्चा घडून यावी तसेच कायस्वरूपी उपाययोजने संदर्भात चर्चा आणि नियोजन व्हावे अशी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो, असे शरद पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies