तरुणांनी शेती नाही केली तर देश शेतीप्रधान कसा राहील ?
निंबुत येथील तरुणांनी नोकरी सोडून सात एकर माळरानावर फुलविली अंजीर बाग
सोमेश्वरनगर
बारामती तालुका हा नेहमीच ऊस बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. उसाचे उत्पादन घेत असताना पाणीटंचाई आणि ऊस वेळेवर तोडला न जाणे यामुळे या भागातील शेतकरी सुद्धा आता ऊसाला पर्याय शोधू लागला आहे. त्यातच आता बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील निंबुत गावातील शेतकरी तरुणांनी आपल्या सात एकर माळरानावर अंजीर फळबागाचं नंदनवन फुलवलं आहे. या अंजीराच्या माध्यमातून वर्षातील सतत दहा महिने उत्पादन घेण्याचा विक्रम देखील या दोन तरुणांनी केला आहे.
दीपक जगताप आणि गणेश जगताप या दोघा भावांनी निंबुत येथील पठारवस्तीवर आपल्या सात एकर माळरानावर अंजिराची लागवड केली आहे. दीपक जगताप यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. मुळातच घरात सर्वांना शेतीची आवड असल्याने दीपक यांनी सुद्धा शेती करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी आपल्या सात एकर जमिनीमध्ये डाळिंब, मोसंबी, संत्रा या फळबागांची लागवड केली. मात्र यामध्ये त्यांना फारसे यश आले नाही. संत्रा, मोसंबीसाठी येथील वातावरण अनुकूल नव्हते, तर डाळिंबाला आलेल्या तेल्या रोगामुळे त्यांना डाळिंबाची बाग सुद्धा काढावी लागली. मात्र त्यांनी २००७ मध्ये प्रथम एक एकर अंजिराची लागवड केली. सुरुवातीला चार वर्ष त्यांना यश आले नाही. मात्र यानंतर त्यांनी अंजीर पिकाबाबत चांगली माहिती घेतली. पुरंदर तालुक्यातील अंजीर उत्पादक अनेक शेतकऱ्यांची त्यांनी संवाद साधला त्यांचेकडून माहिती घेतली. तर बारामती येथील कृषी विभाग आणि केवीके यांचे देखील मार्गदर्शन घेतले.यानंतर जगताप यांना अंजीर उत्पादनात मोठे यश आले. पुरंदर तालुक्याच्या अगदी जवळ त्यांची शेती असल्याने पुरंदर तालुक्यातील वातावरण आणि त्याच्या शेतातील वातावरणात साम्य आहे याचा त्यांना फायदा झाला.
त्यांच्याकडे आता सात एकर क्षेत्रामध्ये अंजिराची बाग आहे. यामध्ये ते अलटून-पालटून खट्टा, मिठा बहर घेतात.
जगताप यांनी अनुभवातून अंजीर फळबागांमध्ये वेगवेगळे प्रयोग केले. त्यामधून त्यांनी अंजीर उत्पादनामध्ये चांगले कौशल्य प्राप्त केले आहे. जगताप यांनी सुरुवातीला पंधरा बाय पंधरा फुटावर अंजिराची लागवड केली होती. यानंतर त्यांनी त्यामध्ये बदल केले. प्रामुख्याने त्यांनी बेड पद्धतीचा वापर केला. अंजिराच्या दोन ओळींमध्ये मोठं अंतर ठेवलं त्याचबरोबर अंजीर छाटणीसाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धती वापरल्या. त्यामुळे त्यांना अंजिरापासून मिळणाऱ्या उत्पादनात मोठी वाढ झाली. पाण्याची कमतरता असल्यामुळे ठिबक सिंचनचा वापर त्यांनी सिंचनासाठी केला. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या काळात पाचटाचा वापर करून आच्छादन केले. यामुळे त्यांना उन्हाळ्यात पाणी कमी लागते. त्याचबरोबर जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण वाढून झाडांची वाढ देखील चांगली होते. त्यामुळे त्यांचा दुहेरी फायदा झाला.
दीपक जगताप त्यांच्या अंजिराच्या शेतात रेड पूना , दिनकर, जंबो जातीच्या आंजिराची लागवड केली आहे.यातून ते वर्षातून दहा महिने उत्पादन घेतात.त्यांना दररोज सरासरी ५०० किलो उत्पादन मिळते.तर सरासरी ४० ते ५० रुपये दर मिळतो. ते नीरा,सांगली कोल्हापूर येथील बाजारात आपला उत्पादित माल विकतात. पुणे बाजारात ते अंजीर विक्रीसाठी पाठवत नाहीत .कारण पुण्यात पुरंदर मधीलअंजीर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असते. वर्षातील १० महिने अंजीर मिळत असल्याने अनेक व्यापारी दररोज त्यांच्याकडून अंजीर खरेदी करतात.
राज्यात व राज्या बाहेरील शेतकऱ्यांना.
दीपक जगताप यांना आता अंजीर उत्पादनातील जवळपास १५ वर्षा पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे. त्यातून त्यांनी अनेक प्रयोग करून चांगल्या प्रकारचे अंजिराचे उत्पादन घेतले आहे अंजिराला येणारे रोग त्यांना द्यावे लागणारे खाद्य औषध यांचे त्यांना चांगली माहिती झाली आहे कोणत्या झाडाचा कोणत्या काळात भर घ्यावा याबाबत देखील त्यांचा अनुभव आता दांडगा आहे त्यामुळे राज्यातील आणि राज्याबाहेरील शेतकरी सुद्धा त्यांचा सल्ला घेत असतात त्याचबरोबर अनेक वेळा क्षेत्रभेटीवर जाऊन त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करत असतात.
अंजिराच्या रोप विक्रीतूनही मिळवले पैसे
जगताप यांनी उत्पादित केलेल्या या अंजिराची प्रत अत्यंत चांगले असल्यामुळे याच अंजिरापासून बियाणे मिळावे अशी अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा असते यातूनच मागील दोन वर्षापासून त्यांनी अंतर रोपांचे उत्पादन देखील घ्यायला सुरुवात केली आहे गेल्या वर्षी ७००० अंजीर रोपांचे उत्पादन घेतले होते. तर यावर्षी २५ हजार रोपांची मागणी त्यांच्याकडे आहे आणि त्याच देखील ते उत्पादन घेत आहेत. यासाठी ते झाडावरच गुटी कलम करतात. फांद्यांना मुळ्या फुटल्यानंतर त्याची पिसवी मध्ये लागवड केली जाते. त्यामुळे त्याच्यात मर होत नाही . शेतकऱ्यांना खात्रीशीर रोप मिळत असल्याने कर्नाटक आंद्र प्रदेश आणि राज्यातील अनेक जिल्ह्यातून रोपांची मागणी त्यांच्याकडे होत आहे.
शेती करण्यासाठी सोडली नोकरी अनेकांना दिला रोजगार
दीपक जगताप यांचे बंधू गणेश जगताप हे पुण्यामध्ये नोकरी करीत होते आठ वर्षा पूर्वी महिना ३२ हजार पागर मिळणारी नोकरी त्यांनी सोडली आणि शेतामध्ये भावाला मदत करायला सुुवात केली.आता त्यांच्याकडे दररोज २५ मजूर काम करतात. जगताप हे आत नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे झाले आहेत.
" भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.मात्र या देशातील शेतकरी आता आपल्या मुलांना नोकरी करण्याचा सल्ला देतो.अगदी लहान पणापासून तसे संस्कार त्याच्यावर केले जातात.शाळेतून दिले जाणारे शिक्षणही शेती पूरक नाही .त्यामुळे येत्या काळात शाळेच्या अभ्यासक्रमात शेती विषयक अभ्यासक्रमाचा सहभाग करायला हवा. तसं झालं नाही तर आपला देश शेती प्रधान देश राहणार"
दीपक जगताप ( शेतकरी )