पुण्यात पुन्हा पोर्शे अपघाताची घटना, उलट्या दिशेने येणाऱ्या चारचाकी चालकाने एकाला उडवले, तरुणाचा जागेवर मृत्य, चालक अल्पवयीन असल्याची माहिती,
June 06, 2024
0
शिरूर, पुणे : पुण्यातील पोर्श अपघाताची घटना ताजी असतानाच आता शिरूर तालुक्यातून देखील एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून धाब्यावरून उलट्या दिशेने येणाऱ्या चार चाकी गाडीने धडक दिल्याने एका निष्पाप तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाल्यांची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
दिपक जालिंदर येठेकर ( वय ३३ ) रा गुंदेगाव यांचा मृत्यु झाला असून यातील चार चाकी चालक हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर चालक फरार झाला असून त्यांनी मद्यपान केले असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
कवठे यमाई येथे अष्टविनायक महामार्गावर एका धाब्याच्या जवळ हा अपघात बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास झाला आहे.अमोल गोरक्ष येठेकर वय 34 वर्षे, व्यवसाय शेती, रा. मु. पो. गुंडेगाव, ता. अहिल्यानगर यांनी फिर्याद दिली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, येमाई - पारगाव रस्त्यावर फिर्यादी यांचा चुलत भाऊ दिपक हा मोटार सायकल नं. एम. एच. 16. सी. आर. 7785 चालवित जेवणाचा डब्बा आणण्या करीता कामगार रंगनाथ बन्सी आढाव याचेसह जात होता. कवठे येमाई बाजूने पारगाव कडे राँग साईडने धाब्यावरून येणा-या इको गाडी नं. एम.एच.12.टी.डी.8718 चालकाने याने त्याचे ताब्यातील इको गाडी ही राँग साईडने भरधाव वेगाने येत असताना त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली . त्यामधे दिपक येठेकर याचा मृत्यू झाला. यावेळी पाठीमागे बसलेला रंगनाथ आढाव हे गंभीर जखमी झाले आहेत.
चार चाकी गाडी चालविणारे तरुण हे एका मित्रांच्या वाढदिवसाची पार्टी असल्यांने धाब्यावर मद्य सेवन करीत फार्महाऊस वर बकऱ्यावर ताव मारायला निघाल्याची चर्चा परीसरात आहे. त्यामुळे वाढदिवसाची पार्टी मात्र एका गरीब मजुराच्या जीवावर बेतली आहे. घटनेनंतर गाडी चालक पसार झाला आहे. गाडीचा मालक कोण ? चालक कोण ? याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेतील आरोपीला गजाआड करण्याची मागणी नागरीकाकडून केली जात आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.