हे लाचार चेहरे पुन्हा टीव्हीच्या पडद्यावर कधी दिसणार नाहीत
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुखांनी लोकसभा निवडणुक व माध्यमांची वस्तुस्थिती मांडली
मुंबई :
नरेंद्र मोदी आणि त्यांच्यामुळे भाजपची आज जी दुर्गती झालीय त्यानं देशातील जे काही आत्मे दु:खी झाले आहेत त्यात "गोदी मिडिया" चे आमचे काही मित्र देखील आहेत. काल सकाळी सुरूवातीला निकालाचे कल जेव्हा भाजपच्या बाजुनं येत होते, तेव्हा गोदी मिडियाच्या अँकरचे आवाज टिपेला गेलेले होते. त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. नंतर हे आवाज क्षीण होत गेले. थोडं थांबा, येत्या काही दिवसात हे आवाजही तुम्हाला ऐकू येणार नाहीत. कारण दहा वर्षात पत्रकारितेचा दुरूपयोग करीत, जनतेच्या प्रश्नांकडे पुर्ण दुर्लक्ष करीत गोदी मिडियानं केवळ एका व्यक्तीच्या आरत्या उतारण्यात धन्यता मानली. त्यानिमित्तानं देशात नुसता उच्छाद मांडला होता. त्याचा फटका देशातील तमाम पत्रकारांना बसला. गोदी मिडियामुळे देशातील सर्वच पत्रकारांकडं लोक संशयानं पाहू लागले. माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला नेऊन ठेवण्याचं महापाप या लोकांनी केलं आहे. अगदी निवडणुकांनंतर Exit poll च्या नावाखाली या लोकांनी जो गोंधळ घातला तो कुठल्याही परिस्थितीत क्षम्य नाही. त्यातून शेअर बाजार कोसळला. अब्जावधीला चुना लागला. हा देशद्रोहच आहे. अंजना ओम कश्यम, रूबिका लियाकत, रजत शर्मा, अमन चोपडा, सुधीर चौधरी, गुल्लु, अर्णब गोस्वामी, श्वेता सिंह, सुमित अवस्थी ही सारी मंडळी याला जबाबदार आहेत. मराठीत देखील असे काही चेहरे आहेत.
प्रशांत किशोर सारख्या भंपक "राजकीय विश्लेषकाला" (?) डोक्यावर घेण्याचं पापही या लोकांनीच केलं. यांची सारयांची मिलीभगत होती. खरं म्हणजे प्रशांत किशोर यांचा एकही अंदाज कधी खरा ठरला नाही. शिवाय हा माणूस ज्या ज्या पक्षाचा माध्यम सल्लागार झाला किंवा त्यांच्या कच्छपी लागला त्या त्या पक्षाची वाट लागली. आज त्यांनी नरेंद्र मोदी यांना वाटेला लावलंय.
निवडणुकीत "मोदी मॅजिक" दिसेल अशी हवा या सर्वांनी तयार केली होती. त्यांची हवा देशातील जागरूक मतदारांनी काढून घेतली. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा, अदानी यांना जेवढं दु:ख झालं नसेल त्यापेक्षा जास्त दु:ख गोदी मिडियाच्या वरील सर्व पत्रकारांना झालं. ते आज नक्कीच आपली छाती बडवून घेत असतील. उद्या इंडिया अलायन्सचं सरकार जर आलं तर मोदी, शहांच्या राजकीय कारकीर्दीचा जसा The End होणार आहे तव्दतच गोदी मिडियाच्या वरील मित्रांच्या पत्रकारितेतील करिअरचा देखील The End होणार आहे. हे लाचार चेहरे पुन्हा टीव्हीच्या पडद्यावर कधी दिसणार नाहीत. हा प्रशांत किशोरचा अंदाज नाही. माझा अंदाज आहे..
#smdeshmukh