थोरल्या पादुका मंदिराची पालखी सोहळा प्रमुखा कडून पाहणी
June 24, 2024
0
आळंदी : वडमुखवाडी पुणे आळंदी रस्त्यावरील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराची पालखी सोहळ्या निमित्त पालखी सोहळा प्रमुख व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी पाहणी केली.
यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, चोपदार बाळासाहेब रणदिवे, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, खजिनदार दत्तात्रय गायकवाड, साहेबराव काशीद, शिवाजी तळेकर, पांडुरंग काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन मंदिरात करण्यात आला.
माऊली मंदिरातुन पालखीचे प्रस्थान आणि पहिला मुक्कामात पाहुणचार घेतल्यानंतर ३० जून रोजी श्रींचा वैभवी पालखी सोहाळा पुणे मार्गे पंढरीला जाण्यास मार्गस्त होतो. यावेळी श्रींचे पालखी सोहळ्याचा पहिला सकाळचा विसावा थोरल्या पादुका मंदिरात होत असतो. त्यावेळी माऊलींचे पादुकांची पूजा आणि आरती परंपरे प्रमाणे अनेक वर्षांपासून येथे होत असते. पहिल्या विसाव्याचे तयारीचा आढावा घेण्यासाठी पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी आणि त्यांचे सहकारी यांनी भेट दिली. यावेळी मंदिराची पाहणी करीत, चर्चा करून काही सूचना करीत संवाद साधला. यावेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. मंदिरात पालखी पादुकांची पूजा दरम्यान श्रींचे पादुकांचे संरक्षण करण्यासह गर्दीवर नियंत्रण आणि यासाठी दक्षता घेण्यास सांगितले. पहिल्या विसाव्यातील श्रींचे पादुका पूजा, आरती प्रसंगी मंदिरात पासधारकांनाच सोडण्यात येणार आहे. अनावश्यक गर्दी करु नये असे आवाहन भाविकांना श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी केले आहे.