पुरंदर विमानतळाचे भूसंपादन लवकरच : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
June 16, 2024
0
नीरा : पुरंदर विमानतळाला डीजीसीए (डायरेक्टर
जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन), एएआय (एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया) यांची मान्यता मिळाली आहे. त्यासोबत एमएडीसीकडूनदेखील एनओसी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, यासंदर्भात तिघांची एकत्रिक बैठक घेऊन येथील जागेची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून लवकरच भूसंपादन प्रक्रिया होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी सांगितले.
केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळावरील विविध प्रश्नांसंदर्भात रविवारी (दि.16) पुणे विमानतळावर आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
दरम्यान, त्यांनी या वेळी येथे उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचीदेखील पाहणी केली. आढावा बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके व प्रशासनातील अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.