मावळच्या आजीची कौतुकास्पद कामगिरी...! वयाच्या ५८ व्या वर्षी बारावीची परीक्षा झाल्या उत्तीर्ण
May 24, 2024
0
मावळ, पुणे : शिक्षणाची आवड कुणाला शांत बसू देत नाही. अनेकांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. शिवाय परिस्थिती पुढे घराची जबाबदारी देखील पडते. मात्र या सर्वांना मात देत मावळ तालुक्यातील एका ५८ वर्षीय आजी चक्क बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी तब्बल ४२ वर्षानंतर त्यांनी ही परीक्षा दिली आणि त्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांच्या या कामगिरीचे संपूर्ण मावळ तालुक्यातून कौतुक होत आहे. बनताबाई पुताजी काजळे / चोपडे असे या आजिंचे नाव आहे.
गेल्या २५ वर्षांपासून या नायगाव येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. त्यांची दोन्ही मुले शिक्षित आहेत. त्या अंगणवाडी सेविका आहे. परिस्थितीमुळे बनताबाई यांचे शिक्षण अर्ध्यावरच सुटले. मात्र ४२ वर्षानंतर अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करणार्या बनताबाई यांनी बारावीची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सरकारने दिलेल्या मुदतवाढीचा फायदा घेत बारावीसाठी बाहेरून परिक्षा देता यावी यासाठी १७ नंबरचा फॉर्म भरला. आणि बारावीच्या अभ्यासाला सुरुवात केली. घरातील काम आणि त्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणून काम केल्यानंतर अभ्यास करीत असे. प्रत्यक्षात जेव्हा पेपर देण्यासाठी आजीबाई वर्गात आल्या तेव्हा सर्वांनीच त्यांचे कौतुक केले.
आजींनी बारावीची परीक्षा दिली आणि बुधवारी त्यांचा निकाल जाहीर झाला. त्या परीक्षेत त्यांना तब्बल ४८ टक्के इतके गुण मिळाले आहेत. आजींनी जिद्दीने ही परीक्षा दिली आणि त्यात त्यांनी यशही मिळवून दाखवले. त्यामुळे शिक्षणाची आवड माणसाला शांत बसून देत नाही. त्याचाच एक उदाहरण म्हणून या आजींचे देता येईल. ५८ वर्षीय या आजींच्या जिद्दीला सलाम.