पिंपरीत शनिवारी शोभायात्रा ! अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या अनुषगांने धार्मिक आयोजन
पिंपरी - १७
अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्रीरामांच्या मृर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २०) शहरात श्रीराम भक्तांच्या वतीने कलश यात्रा, शोभायात्रा व राम रसायन यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक धनराज बिरदा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अयोध्येत होत असलेल्या श्रीराम प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर देशभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहे. तसेच अक्षता घरोघरी वाटप करण्याची मोहीमही मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
त्याचाच भाग म्हणून शनिवारी दुपारी साडेतीन वाजता पिंपरी कॅम्पातील शगुन चौक येथून सुरू होणाऱ्या शोभायात्रेचा पिंपरीगावातील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणात समारोप होणार आहे. तसेच तेथे संपूर्ण १०८ राम रसायन यज्ञ होणार आहे. त्यामध्ये सर्वांनी जात-पात, पंथ-प्रात सोडून सहभागी व्हावे. असे आवाहन बिरदा यांनी केले आहे.