पुरंदरला २५ कोटींचा निधी त्वरित उपलब्ध करा : अजित पवार.
पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती विविध विकास कामांची मागणी.
पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकार्यांनी नुक्तेच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत तालुक्यातील प्रस्तावित कामांसाठी निधी उपलब्ध करावा अशी विनंती केली होती. या सर्व मागण्या मान्य करून पवार यांनी पुरंदर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी २५ कोटीं रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश नुकतेच दिलेले आहेत. याबाबतची माहिती पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी आज माध्यमांना दिली.
प्रा . दुर्गाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत येणाऱ्या जनसुविधा, नागरी सुविधा, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, नगरोत्थान, लघु पाटबंधारे, अंतर्गत शाळा दुरूस्ती, साकव बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, व्यायामशाळा सहाय्यक अनुदान, क्रिडांगणाचा विकास (क्रिडा साहित्य), ग्रामीण मार्गासांठी ३०५४ तसेच जिल्हा मार्गासाठी ५०५४ अशा विविध योजनांच्या व शिर्षकांखाली पुरंदर तालुक्यातील विकास कामांसाठी रूपये २५.०० कोटीचा निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश नुकतेच दिलेले आहेत. यामुळे पुरंदर तालुक्यामध्ये विकास कामांना मोठ्याप्रमाणात गती मिळणार असून सर्वसामान्य नागरीकांचे, ग्रामस्थांचे विविध प्रश्नही मार्गी लागणार आहेत.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, संचालक प्रवीण शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम धुमाळ पुरंदर हवेली मतदार संघाचे अध्यक्ष वामनराव जगताप, महिला अध्यक्ष वंदना जगताप, माई सस्ते, युवक अध्यक्ष अमित झेंडे, इश्वर बागमार, सोमेश्वरचे संचालक मोहन जगताप, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप, सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार, शिवाजी साळूंखे, नाना सस्ते, अभय थोपटे, अभी दुर्गाडे, धोंडीराम कटके आदी उपस्थित होते.
अजित दादांनी पुरंदर तालुक्यातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तालुक्यातील जनतेच्यावतीने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.