आदर्श पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा
उत्तर आणि दक्षिण नगर जिल्हा
आदर्श जिल्हा पत्रकार पुरस्काराचे मानकरी.
शिरूर, माजलगाव, माहूर, साक्री, तेल्हारा, बत्तीस शिराळा, आर्वी, अंबरनाथ तालुका संघ ठरले आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे मानकरी.
मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारया वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांची आज एस.एम.देशमुख यांनी घोषणा केली आहे. प्रत्येक महसूल विभागातून एक याप्रमाणे राज्यातील आठ तालुका पत्रकार संघ या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. जिल्हा संघ पुरस्कार यंदा प्रथमच विभागून देण्यात आला आहे. येत्या १३ जानेवारी रोजी माहूर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचेही एस.एम देशमुख यांनी स्पष्ट केले.
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न राज्यातील अनेक जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ आपआपल्या कार्यक्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत कार्य करीत असतात, तसेच मराठी पत्रकार परिषदेचे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवत असतात. अशा तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांचा राज्यस्तरावर गौरव करण्याचा निर्णय परिषदेने घेतला. त्यानुसार गेली दहा वर्षे मराठी पत्रकार परिषद हे पुरस्कार देत आहे. मराठी पत्रकार परिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष "संध्या" कार वसंतराव काणे आणि "संचार" कार रंगा अण्णा वैद्य यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात.
या वर्षीच्या पुरस्कारांचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत.
रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा उत्तर नगर आणि दक्षिण नगर जिल्ह्यांना विभागून देण्यातआला आहे.
वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार
१) पुणे विभाग : शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा पुणे
२) लातूर विभाग : माहूर तालुका पत्रकार संघ, जिल्हा नांदेड
३) नाशिक विभाग : साक्री तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा धुळे
४) मराठवाडा विभाग : माजलगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा बीड
५) अमरावती विभाग : तेल्हारा तालुका पत्रकार संघ, जिल्हा अकोला
६) कोल्हापूर विभाग : बत्तीस शिराळा तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली
७) नागपूर विभाग : आर्वी तालुका पत्रकार संघ जिल्हा वर्धा
८) कोकण विभाग : अंबरनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा ठाणे.
नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे १३ जानेवारी २०२४ रोजी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर यांनी पुरस्कार प्राप्त सर्व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.