नीरेत फटाक्यांच्या ठिणगीने ऊस पेटला.
ज्युबिलंटच्या फायरब्रीगेडने केले शर्तीचे प्रयत्न.
पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील नीरा शहराला लागून असलेल्या शेतातील ऊसाला आग लागली होती. मंगळवारी (दि. १४) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास फटाक्यांची ठिणगी पडल्याने केशव लक्ष्मण बंडगर यांच्या शेतातील ऊस पेटल्याने मोठे नुकसान झाले आहे.
नीरा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मागील बाजूस असलेल्या शेतातील उभा ऊस अचानक पेटला. गेली तीन दिवस दिवाळी निमित्त मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास स्कायशॉट फटाक्यांची ठिणगी केशव बंडगर यांच्या शेतातील २० गुंटे क्षेत्रातील १५/७ /२०२२ ची लागण असलेल्या उसाच्या फडात पडली. त्यामुळे उभा ऊस पेटू लागला. स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले पण आग आटोक्यात येत नसल्याने ज्युबिलंट कंपनीच्या अग्निशमन दलाला फोन करण्यात आला. ज्युबिलंटचे फायर कर्मचारी तात्काळ दाखल झाले.
आग लागलेल्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता अत्यंत अरुंद होता. त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी पोहचण्यात अडचणी आल्या. तरीही फायर कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे.