घरकुल हे प्रविण जोशींचे पुस्तक क्रांतीची ठिणगी पेटवणारे ठरेल ! आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे
नीरा दि. १७
"घरकुल ही दीर्घकथा आत्ताच्या परिस्थितीचे वास्तव समाजापुढे मांडते. एका अल्पशिक्षित तरुणाच्या बंडाची ही कथा समाजातील विपरीत गोष्टींवर सडकून टीका करणारी आहे. राजकारणातील नियमबाह्य प्रकारांना मांडणारी आहे. वास्तवाचे भान ठेवून सरकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना होत नसल्याचे वास्तव लेखकाने पुढे आणले आहे. क्रांतीची ठिणगी पेटवणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे." असे प्रतिपादन जिल्ह्याचे आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांनी केले.
नीरा (ता.पुरंदर) येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात परीस पब्लिकेशन पुणे यांच्या मार्फत प्रकाशित व प्रसिद्ध ग्रामीण लेखक प्रविण जोशी यांच्या 'घरकुल' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. वाघमोडे तसेच सोमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बापूराव गायकवाड होते.
डॉ.वायदंडे म्हणाले, "सरकारी योजनांबाबत एका शिक्षक लेखकाचे निरीक्षण पाहण्यासारखे आहे. पुस्तकातून अनिष्ठ प्रकारांवर लेखकाने हल्लाबोल चढवला आहे. सदरचे पुस्तक नवा विचार देणारे आहे. यावेळी शंकरराव भेलके महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ.जगदीश शेवते, टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. महादेव रोकडे, डॉ. प्रदीप पाटील, लेखक संतोष शेंडकर, ऍड. बापूसाहेब शिलवंत, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ननवरे, मोहम्मदगौस आतार, दत्तात्रय बडबडे, कांचन निगडे, सुरेश जगताप, उत्तम निगडे, सुधीर निगडे, पृथ्वीराज निगडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, "लेखकाने अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना पुढे नेले आहे.घरकुल या कथेतील नायक रडणारा नाही तर लढणारा आहे. परिस्थितीपुढे हतबल न होता लढायला शिकायला हवे."
प्रास्ताविक राहुल शिंदे यांनी केले. भरत निगडे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रविण जोशी यांनी आभार मानले.