नीरा येथे पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर ट्रक झाला पलटी
सुदैवाने जिवीतहाणी नाही
नीरा दि.४
पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर बुधवारी पहाटे लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामध्ये ट्रकच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.साईटपट्टी खचली असल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक लोकांनी म्हटले आहे.
या संदर्भात ट्रकचालक शहाजन शेख (वय 38 रा.तुळजापूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे ते पुण्याहून साताराकडे निघाले होते. त्यांच्या ट्रक मध्ये लोखंडी पाईप भरलेले होते. पिंपरे आणि निरा यांच्या दरम्यान पुणे पंढरपूर महामार्गावर असताना समोरच्या बाजूने एसटी बस आल्याने त्यांनी त्यांचा ट्रक साईड पट्टीवर उतरवला. मात्र साईटपट्टीवर चिखल झाला असल्याने व ती मजबूत नसल्याने ट्रकची डाव्या बाजूचे दोन्ही चाके या चिखलामध्ये खचली आणि ट्रक हळूहळू करत गटारामध्ये पलटी झाला. ट्रक चालक वेळीच ट्रकमधून खाली उतरल्याने त्याला काही झाले नाही. मात्र यामध्ये ट्रकच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुणे पंढरपूर पालखी महामार्ग हा पिसूर्टी फाटा ते निरा या दरम्यान अत्यंतअरुंद आहे. त्यामुळे दोन वाहने आल्यास एक वाहन रस्त्यावरून खाली घ्यावे लागते. रस्त्याच्याकडेला असलेली साईडपट्टी ही खराब आहे. त्यामुळे जड वाहने या साईट पट्टीवर लगेच खचतात आणि पलटी होतात. मात्र बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात होत आहेत आणि वाहन चालकांना व मालकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
चौकट
तातडीने रस्ता दुरुस्त न केल्यास येत्या पाच दिवसात रस्ता बंद करणार : कायदेतज्ञ पृथ्वीराज चव्हाण
पिसूर्टी ते निरा यादरम्यानचा अरुंद रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यामुळे अनेकांना आपला जीव गमावू लागला आहे. चार दिवसांपूर्वीच पिंपरे येथील एका ४५ वर्षे व्यक्तीला आपला जीव गमावा लागला होता आणि आज पहाटे पुन्हा एकदा या ठिकाणी अपघात झाल्याने निरा आणि परिसरातील लोकांनी केंद्रीय बांधकाम विभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. निरा येथील कायदेतज्ञ पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील मोठा संताप व्यक्त केला आहे पाच दिवसात या रस्त्याचं काम सुरू केलं नाही तर हा रस्ता जेसीबीने खोदून बंद केला जाईल असा इशारा त्यांनी केंद्रीय बांधकाम विभागाला दिला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने प्राधान्य क्रमाने हा रस्ता दुरुस्त करावा. या रस्त्याचे रुंदी वाढवावी अन्यथा होणाऱ्या आंदोलनाला आणि नुकसानाला केंद्रीय बांधकाम विभाग जबाबदार असेल असं म्हणत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.