नागपुरात पत्रकारावर रात्रीच्या १२ वाजता हल्ला
मराठी पत्रकार परिषदेनेने हल्लयाचा निषेध करत, हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी
नागपूर :
नागपुरातील पत्रकार कृष्णा मस्के यांच्यावर सोमवारी रात्री १२ वाजता तीन अज्ञात युवकांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. या हल्ल्यात पत्रकार कृष्णा मस्के थोडक्यात बचावले. या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून डीसीपी झोन ४ नेही गंभीर दखल घेतली आहे. हल्लेखोरांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.
पूर्व नागपुरातील वाठोडा येथे १४ सप्टेंबर रोजी "शासन आपल्या दारी" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शिबिराला स्थानिक पदाधिकाऱ्याचे सहकार्य होते असे मस्के यांनी बातमीत म्हटले होते. शिबिरात दलालांचा सुळसुळाट असल्याची बातमीही कृष्णा मस्के यांनी त्यांच्या वेबपोर्टलवर लावली होती. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पूर्व नागपुरात वाठोडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून मस्के यांना अटक करण्याची मागणी केली गेली होती.
त्यानंतर त्यांना पदाधिकाऱ्यांतर्फे धमक्या येऊ लागल्या. त्या संदर्भात नंदनवन पोलिस ठाण्यात पत्रकार कृष्णा मस्के यांचा समर्थनार्थ सामाजिक संघटनानी धमक्या देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली होती. परंतु काल रात्री अचानक त्यांच्यावर भर चौकात रात्री हल्ला करण्यात आला. यातून ते थोडक्यात बचावले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडिया परिषदेनेने हल्लयाचा निषेध केला असून हल्लेखोराना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे.