कोकणातील पत्रकारांचे बुधवारी वाकण नाका येथे बोंबाबोंब आंदोलन
लोकप्रतिनिधींना १०,००० एस.एम एस पाठविणार
महाड :
मुंबई - गोवा महामार्गावरील जीवघेणे खड्डे तात्काळ भरावेत आणि गेली १२ वर्षे रखडलेले महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी कोकणातील पत्रकार बुधवारी म्हणजे ९ ऑगस्ट रोजी बोंबाबोंब आंदोलन करीत आहेत. वाकण नाक्यावर हे आंदोलन होत असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०११ मध्ये सुरू झाले. १२ वर्षे होऊन गेले तरी काम पूर्ण झालेले नाही. सरकारने वेळोवेळी अनेक वादे केले पण काम पूर्ण झाले नाही. चौपदरीकरण तर होत नाहीच उलट रायगड जिल्ह्यात या रस्त्याची चाळण झाली असल्याने हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनला आहे. मात्र सत्ताधारी आणि कोकणातील लोकप्रतिनिधींनी या ख्ड्याबाबत आणि महामार्गाबाबत कमालीचे मौन बाळगून आहेत. त्यामुळे कोकणातील मंत्री, खासदार आमदार यांना बोलतं करण्यासाठी, जाब विचारण्यासाठी आणि कोकणातील लोकप्रतिनिधींची निष्क्रीयता जगाच्या वेशिवर टांगणयासाठी बुधवारी पुन्हा एकदा रायगडमधील पत्रकार एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरत आहेत. परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर देखील आंदोलनात सहभागी होत आहेत. कोकणातील जनतेनं आंदोलनात सहभागी होऊन लोकप्रतिनिधींना जाब विचारावा असे आवाहन मनोज खांबे आणि रायगड प्रेस क्लबनं केलं आहे.
*१० हजार एस.एम एस पाठविणार*
महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल लोकप्रतिनिधींना जाब विचारणारे १० हजार एस.एम. एस. पाठविले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे यांना हे एस. एम. एस. ९ ऑगस्टच्या सकाळपासून पाठविले जाणार आहेत. रायगडातील नागरिकांनी या एस. एम. एस. आंदोलनात सहभागी होऊन आपल्या तीव्र भावना लोकप्रतिनिधींच्या थेट कानावर घालाव्यात असं आवाहनही रायगड प्रेस कलबनं केलं आहे.
रायगडमधील पत्रकारांच्या बोंबाबोंब आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ आपल्या तहसिलदार आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनं देऊन आपला संताप व्यक्त करतील अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी दिली आहे.