नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा
नीरा. दि. ४
नदीच्या खोऱ्यामध्ये मागील काही काळापासून पडत असलेल्या पावसामुळे या खोऱ्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. नीरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या वीर, भाटगर, नीरा देवघर आणि गुंजवणी या धरणांचा एकूण पाणी साठा ८० टक्क्यांहून जास्त झाला आहे. गेल्या वर्षी याची दिवशी हा पाणी साठा कमी होता.
राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत असला तरी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात मात्र बेताचाच पाऊस झाला आहे. त्यातही पुरंदर आणि भोर तालुक्यात पावसाचे प्रमाण नेहमी पेक्षा कमीच आहे. भोरमध्ये काही प्रमाणात पाऊस पडत असल्याने भोर आणि वेल्हा तालुक्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. तर पुरंदर आणि खंडाळा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वीर धरणात देखील चांगला पाणीसाठा झाला आहे. आज शुक्रवारी सकाळी या धरणांचा एकूण पाणीसाठा ८२ टक्के झाला आहे. त्यामुळे निरा डावा कालवा आणि उजवा कालवाच्या लाभक्षेत्रात असलेल्या शेतीला याचा मोठा फायदा होणार आहे. आज शुक्रवारी सकाळी पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहिती नुसार वेल्ह्यातील गुंजवणी धरण ७३ टक्के भरले आहे. भोर मधील भाटघर धरण ७६.१६ टक्के भरले असून या धरणामध्ये आता १७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.नीरा देवघर धरण ९४ टक्के भरले आहे.यामध्ये ११ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.तर वीर धरण ८४.८७ टक्के भरले आहे या धरणात ७.९८४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर गुंजवणी धरणात धरणात २.७२२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
तर या चारही धरणात मिळून एकूण ३९.५४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर मागील वर्षी आजच्या दिवशी या सर्व धरणात मिळून ३७.५४९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.म्हणजे यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी वीर धरणातून नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते.मात्र यावर्षी नीरा नदीच्या अद्याप पाणी सोडण्यात आले नाही .त्यामुळे नदीकाठच्या लोकांना नदी पत्रात केव्हा पाणी येते आहे.याची प्रतीक्षा आहे.