Type Here to Get Search Results !

संरक्षण करण्यास कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी. दि.१७ ऑगस्ट रोजी ११ संघटना राज्यभर निदर्शने करणार

 संरक्षण करण्यास कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी.


दि.१७ ऑगस्ट रोजी ११ संघटना राज्यभर निदर्शने करणार







मुंबई :  पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर झालेल्या हल्लयाचा निषेध करण्यासाठी येत्या १७ ऑगस्ट २२ रोजी मुंबईसह राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या ११ पत्रकार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

       या दिवशी मुंबईत दुपारी १२ वाजता हुतात्मा चौकात हे आंदोलन होईल. बैठकीच्या आरंभी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी पाचोऱ्यातील घटनेची सविस्तर माहिती देऊन सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन आमदाराच्या दादागिरीच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे असा आग्रह धरला. तेव्हा सर्व उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यास संमती दर्शवत १७ ऑगस्ट रोजी राज्यभर निदर्शने करून पत्रकारांचे संरक्षण करण्यास निष्प्रभ ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

        यावेळी उपस्थित सर्वच संघटनांच्या प्रतिनिधींनी किशोर पाटील यांच्या अरेरावीचा निषेध करीत किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सुसंस्कृत महाराष्ट्रात कायदे मंडळाचा एक सदस्यच कायदा हातात घेऊन आपल्या असंस्कृतपणाचे दर्शन घडवतो, आणि वरती "होय मीच शिव्या दिल्या, काय करायचं ते करा अशी" अशी मस्तवाल भाषा वापरतो हे चिंताजनक, संतापजनक आणि किळसवाणे असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री, गृहमंत्री आदिंना संयुक्त निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. 

        महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात ४६ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ करीत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरला असल्याने पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. राज्यातील पत्रकार संघटनांनी, पत्रकारांनी एकत्र येत १७ ऑगस्ट रोजी आपल्या तालुक्याच्या तहसिल आणि आणि जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करावी असे आवाहन सर्व पत्रकार संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.

      बैठकीस अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशन, मुंबई मराठी पत्रकार संघ, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, बीयूजे, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, पोलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोशिएशन, म्हाडा पत्रकार संघ, महापालिका पत्रकार संघ आदि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर या संघटनांनी राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट घेऊन राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबद्दल त्यांच्याकडे चिंता व्यक्त केली.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies