दुचाकीची चावी काढून घेण्याचा पोलिसांना अधिकार नाही! वाहतूक पोलिसांना सत्र न्यायालयाचा झटका
मुंबई दि.१८
वाहतुकीचे नियम मोडून शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या तरुणाला मुंबई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. याच वेळी पोलिसांच्या कार्यपद्धतीतील त्रुटींवर बोट ठेवत न्यायालयाने वाहतूक पोलिसांना मोठा झटका दिला.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीची चावी काढून घेण्याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नाही. तसेच दुचाकीचालकाने ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यानंतर दंडवसुलीसाठी त्याला पोलीस ठाण्यात येण्याची सक्ती करू शकत नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, कुलाबा परिसरातील एन.एस. रोडवरील सिग्नलवर सागर पाठक हा तरुण विनाहेल्मेट दुचाकी चालवत होता. वाहतूक पोलीस जवळ येत असल्याचे पाहून त्याने लगेच हेल्मेट घातले होते. या वेळी वाहतूक नियम मोडल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दंडवसुलीची कारवाई सुरू केली, तेव्हा सागरने कर्तव्यावर असलेल्या कॉन्स्टेबलवर हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणी कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून सागरविरुद्ध भादंवि कलम 332 आणि 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि 25 मे 2017 रोजी त्याला अटक केली होती. मागील सहा वर्षे या घटनेचा खटला सत्र न्यायालयात चालला. आरोपी सागरने कॉन्स्टेबलकडे ड्रायव्हिंग लायसन्स जमा केले होते. त्यानंतर त्याला मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला गेला. याचदरम्यान कॉन्स्टेबलवर हल्ला केल्याचा आरोप होता. तथापि नियम मोडणाऱ्या दुचाकी चालकाने पोलिसांकडे ड्रायव्हिंग लायसन्स जमा केल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेणे हे बेकायदेशीर कृत्य आहे, असे मत नोंदवत सत्र न्यायाधीश निखिल मेहता यांनी आरोपी सागर पाठकची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केली आहे, ते पाहता वाहतूक पोलिसावर शासकीय कर्तव्य बजावताना हल्ला झाल्याचे म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
न्यायालयाने काय म्हटले?
वाहतूक पोलिसाने ड्रायव्हिंग लायसन्स ताब्यात घेतले होते. त्यामुळे आरोपीचे नाव आणि पत्ता कळला होता. त्याआधारे वाहतूक पोलीस जुन्या वाहतूक नियमांनुसार कारवाई करू शकले असते. तथापि, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चालकाकडून जबरदस्तीने दंडाची रक्कम मागण्याचा अधिकार नव्हता.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर ई-चलान, पावती प्रक्रिया किंवा नोंदणी क्रमांकाचे छायाचित्र घेऊन कारवाई केली जाऊ शकते, यात वाद नाही. दुचाकी चालकाला पोलीस ठाण्यात येण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. आरोपी चालकाने ड्रायव्हिंग लायसन्स जमा केल्यास, त्याला दंडाची रक्कम संबंधित प्राधिकरणासमोर जमा करण्यास व त्यानंतर लायसन्स परत घेण्यास सांगू शकतो.