भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांवर यापुढे विश्वास ठेऊ नका
महादेव जानकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
नीरा : दि.११
भाजप आणि राष्ट्रीय काँग्रेस हे दोन्ही पक्ष विश्वास ठेवण्यासारखे पक्ष नाहीत. हे दोन्ही पक्ष छोट्या पक्षांना संपवून टाकतात आणि म्हणूनच यापुढे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर विश्वास ठेवू नका. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करू नका, असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा त्याचबरोबर माजी खासदार महादेव जानकर यांनी केल आहे ते गुरुवारी निरा येथे बोलत होते.
भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे राजकारण हे दिल्लीतून चालते. ते राज्य पातळीवरील पक्ष्यांना फारशी किंमत देत नाहीत. ते त्यांना बरोबर घेतात आणि संपवून टाकतात. त्यामुळे अशा पक्षांवर विश्वास न ठेवलेला बरा. त्यापेक्षा शरद पवारांचा पक्ष असो, उद्धव ठाकरे यांचा पक्ष असो की एकनाथ शिंदेंचा पक्ष असो अशा छोट्या पक्षांना यापुढे मदत करा. पण राष्ट्रीय पक्षांना मदत करू नका असे स्पष्ट आवाहन जानकर यांनी यावेळी केले.सत्यशोधक समाज प्रबोधन राष्ट्रसंघटना व राष्ट्रीय समाज पक्ष पुरंदर तालुका यांच्यावतीने माजी मंत्री महादेव जानकर यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा नीरा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात झाला. यावेळी जानकर बोलत होते. यावेळी जानकर यांंना ५५ हजार रुपयाचा लोकनिधी संकलन करून देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुरंदर तालुका अध्यक्षपदी संजय निगडे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कशिनाथ शेवते होते. यावेळी माऊली सरगर,पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रूपनवर, सातारा जि. अध्यक्ष खंडेराव सरक, किरण गोपणे, पश्चिम महाराष्ट्र समन्वय सचिन गुरव, अँड.संजय माने, तानाजी शिंगाडे, निलेश लांडगे, विषाणु गोरे, अंकुश देवडकर आदी उपस्थित होते. नीरा येथील शिवसेनेचे दयानंद चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कशिनाथ शेवते यांनी जानकर यांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.
संजय निगडे मित्रपरिवाराच्या वतीने कर्नलवाडीचे माजी सरपंच सुधीर निगडे, पृथ्वीराज निगडे, दयानंद चव्हाण, प्रमोद निगडे, सत्यवान निगडे, धनराज कोंडे, दत्तात्रय निगडे, राहुल निगडे यांच्या हस्ते ५५ हजार रुपयांची माळ जानकर यांना घालण्यात आली.
यावेळी झालेल्या कर्यक्रमाचे प्रास्ताविक संजय निगडे यांनी केले. सुत्रसंचलन विनायक रुपनवर तर आभार शेखर खरात यांनी मानले.