माजी आमदार अशोकराव टेकवडे यांचा लेटर बॉम्ब
तालुक्यातील राष्ट्रवादीत खळाबळ
नीरा दि.१२( राहुल शिंदे )
पुरंदर तालुक्यात सध्या एका पत्राने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.त्यातून एका पक्षातील एका नेत्याची किंवा पक्षातील अनेक नेत्यांची घुसमट बाहेर येत आहे.माजी आमदार अशोक टेकवडे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांना लिहिलेल्या पत्राची चर्चा सर्वत्र होत असून सोशल मीडियातून ही याच पत्राची चर्चा सुरू आहे.मात्र यामुळे राष्ट्रवादीतील दुफळी या निमित्त पुढे आली आहे.तर येत्या १७ तारखेला अजित पवार पुरंदरच्या दौऱ्यावर असणार आहेत.त्यामुळे या पत्राचा परिणाम पुढील काळात काय होतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुरंदर तालुका राष्ट्रवादी म्हणजे पदाधिकाऱ्यांचा पक्ष अशी स्थिती निर्माण झाली आहे. यापक्षात पदाधिकारी जास्त आहेत .मात्र कार्यकर्त्यांची मोठी उणीव या पक्षात आहे.त्यातही या पदाधिकाऱ्यांच्या कुरघुड्या नेहमीच सुरू असतात.या पक्षाला तालुक्यात मोठा जनाधार आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या तालुक्यात आहे. त्याच बरोबर केवळ शरद पवार यांना विरोध करणारा सुद्धा एक वर्ग आहे.त्यामुळेच पवार या भागात फारसे लक्ष देत नाहीत.या भागात काम केल्यावर नेहमीच उपेक्षा वाट्याला येत असल्याचा अनुभव पवारांच्या गाठीशी आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर मागील काळात खा.शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील जवळाअर्जुन हे गाव दत्तक घेतले.विकास केला.त्याच बरोबर आपल्या एका सहकारी खासदाराला पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गाव दत्तक घ्यायला सांगितले. दोन्ही गावात अनेक विकास कामे झाली. मात्र याच गावात पवार यांना मोठा झटका बसला.दोन्ही गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला लोकांनी नाकारले.त्यामुळे काम करूनही पवारांच्या वाट्याला काही आले नाही . आता त्याच गावातील म्हणजेच जवळाअर्जुन येथील असलेले व माजी आमदार असलेले अशोक टेकवडे यांनी जिल्हा अध्यक्षांना पत्र लिहून तालुका अध्यक्षांबाबत तक्रार केली आहे. यामधून त्यांनी अध्यक्षांवर गंभीर असे आरोप केले आहेत. आणि अध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. यापुढे जाऊन यापुढील काळात पक्षाच्या कोणत्याही बैठकीला किंवा सार्वजनिक कार्यक्रमात आपण सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तालुका राष्ट्रवादीत मोठा बेबनाव असल्याचे स्पष्ट होते आहे.
नेत्यांचा बेबनाव भाजपच्या पथ्यावर
भाजपने बारामती लोकसभा 2024 मध्ये कसल्याची परिस्थितीत जिंकायचीच दृढनिश्चय केला आहे.त्यासाठी राष्ट्रवादी,आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटाच लावला आहे.मागील दहा दिवस पूर्वीच तालुक्यातील काही लोकांनी भाजप मध्ये प्रवेश केला.असे असले तरी पदाधिकारी मात्र एकमेकाची उनीधूनी काढण्यात मग्न आहेत.त्यामूळे सुप्रिया सुळे यांना पुढील काळात मोठा संघर्ष करावा लागू शकतो.
कोट १)
अशोक टेकवडे (माजी आमदार)
सध्याचा अध्यक्ष पक्षाच्या कामाकडे दुर्लक्ष करतो आहे.त्यातच सतत आजाराचे कारण सांगून अध्यक्ष पक्ष कामाकडे दुर्लक्ष करतात. अध्यक्षांची मुदत एक वर्षापूर्वीच संपली आहे . त्यामूळेच आपण हे पत्र पक्ष अध्यक्ष यांना दिले आहे.तेच काय तो निर्णय घेतील
कोट २)
माणिकराव झेंडे (अध्यक्ष,पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस )
माझी मुदत संपली आहे.पक्षाने सांगितले तर मी कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करेन अध्यक्षच असायला पाहिजे असं काही नाही.आणि ज्यांनी पाच वर्ष आमदारकी केली.तरी त्यांना आपल्या गावात स्वतः च्या मुलाला सरपंच बनवता आले नाही .याला पक्षाला जबाबदार धरने योग्य नाही. मी पक्षाच्या धेय्य धोरणा नुसारच काम करतो आहे.आणि मी कधीही वरिष्ठांकडे कोणाच्या तक्रारी करीत नाही.
कोट 3)
सोमनाथ कणसे ( सरपंच , जवळाअर्जुन )
अशोकराव तेकावडे यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही भाजपचा रस्ता धरला.ते स्वतः काही करीत नाहीत फक्त दुसऱ्याला दोष देतात खरतर त्यांना भाजपमध्ये जायचं होत पण त्यांना संधी मिळाली नाही.आता त्यांची त्यांच्याच पक्षात सुखी राहावं कारण त्यांच्या अगोदर आम्ही भाजप मध्ये आलो आहोत.आता त्यांच्या साठी भाजपचे दरवाजे बंद आहेत.