तेल्या भुत्याच्या कावड यात्रेतील बैलगाडीला निरा येथे अपघात : टेम्पो ने धडक दिल्याने बैल झाला गंभीर जखमी
नीरा दि. ८
पुरंदर तालुक्यातील सासवड येथून शिखर शिंगणापूर यात्रेसाठी गेलेल्या सासवड येथील तेल्या भुत्याच्या कावडीचा सध्या परतीचा प्रवास सुरू आहे. ही कावड आज शनिवारी निरा येथे मुक्कामी आली. मात्र या दरम्यान या कावडीच्या यात्रेतील एका बैलगाडीला टेम्पोची जोरदार धडक बसून यातील एक बैल गंभीर रित्या जखमी झाला आहे. सुदैवाने यामध्ये दुसरं कोणीही जखमी झालं नाही. मात्र या जोरदार धडकेमुळे बैल गंभीर जखमी झाला असून तो रस्त्यातच पडला होता. यानंतर खाजगी पशुवैद्याने त्याच्यावर उपचार केले आहेत.
पुरंदर तालुक्यातून अनेक कावडी या शिखर शिंगणापूर येथे महादेवाला कऱ्हेच्या पाण्याने स्नान घालण्यासाठी जात असतात. बार्शी दिवशी धार पडल्यानंतर या कावडी आता माघारी फिरल्या आहेत सासवड येथील मानाची असलेलो तेल्या भुत्याची कावड सर्वात शेवट येत असते. ही कावड आज निरा येथे आठ वाजता मुक्कामासाठी आली. निरा येथील नगर बायपासवर या कावडीतील बैलगाड्या आल्या असताना सातारा बाजू कडून आलेल्या एका टेम्पोने (क्रमांक एम.एच. ४६- बी.एम. ३६१८) या तांड्यातील अगदी मध्ये असलेल्या एका बैलगाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये बैल गंभीर जखमी झाला. निरा येथील ग्रामस्थांनी आणि यात्रेकरूंनी तातडीने मदत करून ही बैलगाडी बाजूला काढली आणि बैलावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून टेम्पो आणि टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.