नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटप जाहीर
आघाडीला कपबशी तर युतीला पतंग
सासवड दि.२१
पुरंदर तालुका आणि बारामती तालुका तील 32 गावांमधून कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काल अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 108 उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यानंतर 16 जागांच्या साठी एकूण 33 उमेदवार रिंगणात आहेत.यासाठी आज शुक्रवारी चिन्ह वाटप सासवड येथील निवडणूक कार्यालयात पार पडले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळाले, तर शिवसेना, भाजप आणि आरपीआय यांच्या युतीच्या पॅनलला पतंग हे चिन्ह मिळाले. अपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे बंडखोर सतीश निगडे यांना विमान हे चिन्ह मिळाले तर शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे यांना छत्री हे चिन्ह मिळाले.
मागील अनेक वर्षांपासून निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक ही शक्यतो बिनविरोध होत होती. काही ठराविक जागा सोडल्या तर संपूर्ण निवडणूक ही बिनविरोध होत होती. त्याकाळी जनता दलाचे दादा जाधवराव, काँग्रेसचे चंदूकाका जगताप, राष्ट्रवादीचे अजित पवार, काकडे गटाचे सतीश काकडे हे सर्वजण एकत्र बसून मार्केट कमिटीची निवडणूक बिनविरोध कशा पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न करत असत. मात्र या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीने पॅनल उभा केल्याने आता निवडणूक अटळ आहे. आज चिन्ह वाटप झाल्यानंतर उद्या राष्ट्रवादीचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे तर शिवसेना भाजप हे देखील आपला पॅनल निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आघाडीच्या दोन जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. पुढील काळात ही निवडणूक चुरशीची होती की, आघाडीसाठी एकतर्फी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.